नारायण राणेंचा नवा पक्ष लवकरच, एनडीएत सहभागी होणार?
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2017 08:16 AM (IST)
एकीकडे नारायण राणेंचं भाजपशी चर्चेची गुऱ्हाळ सुरु आहे. त्यामुळे राणेंचा नवा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा जोर धरु लागलेल्या असतानाच आता वेगळा ट्विस्ट आलेला आहे. राणेंनी नवा पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून येत्या 1 ऑक्टोबरला ते यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. 'माझा'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत. येत्या 1 ऑक्टोबरला राणे पत्रकार परिषद घेऊन नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. एकीकडे नारायण राणेंचं भाजपशी चर्चेची गुऱ्हाळ सुरु आहे. त्यामुळे राणेंचा नवा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये राणेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याचीही चिन्हं आहेत. राणेंचे पुत्र नितेश राणे यांची 'स्वाभिमान' संघटना कोकणात तळागाळात पसरली आहे. त्याचा आधार घेत नव्या पक्षा पाळंमुळं रोवण्याचा राणेंचा प्रयत्न असेल. दसऱ्यापर्यंत आपण आपली पुढची वाटचाल स्पष्ट करु असं राणेंनी कुडाळमधील पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. पण या भेटीत राणेंच्या भाजप प्रवेशावर फार काही चर्चा झाली नाही.