मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. शिवाय, मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारचीच इच्छा नाही, असा आरोपही राणेंनी केला आहे.
मोर्चांच्या दणक्यामुळेच सेनेचा पाठिंबा!
मराठा क्रांती मोर्चाच्या दणक्यामुळेच शिवसेनेने मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला, असे म्हणत राणेंनी ‘सामना’ दैनिकातील मराठा मोर्चासंदर्भातील वादग्रस्त व्यंगचित्रावरुन उद्धव ठाकरे यांना धारेवर धरलं.
उद्धव ठाकरेंकडून स्वार्थापोटी माफी : राणे
“सामना दैनिकातील व्यंगचित्राचे पडसाद राज्यभर उमटल्यामुळे राजकीय स्वार्थापोटी उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली. शिवाय, शिवसेनेतील मराठा आमदार-खासदारांनी राजीनामे पाठवल्यानंतर त्यांना माफी मागितली.”, अशी टीका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
राज ठाकरेंवर राणेंची तोफ !
राज ठाकरेंवर सहसा टीका न करणाऱ्या नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनाही सोडलं नाही. “राज ठाकरेंकडून मराठा आरक्षणाला पाठिंब्याची अपेक्षा नाही.”, अशा शब्दात राणेंनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.
“पुरंदरेचा पुळका असणाऱ्यांकडून अपेक्षाही नाहीत”
छत्रपतीं शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडणाऱ्या पुरंदरेचा पुळका असणाऱ्यांकडून का अपेक्षा करणार?, असा सवालच राणेंनी राज यांच्यावर बोलताना विचारला. शिवाय, “जो पक्ष उगवता उगवता मावळला, त्या पक्षाने या मुद्द्यात लक्ष घालू नये.”, असा टोलाही राणेंनी राज यांना लगावला.
सरकारची इच्छाशक्ती नाही!
उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना राणे म्हणाले, “अधिवेशन घ्या म्हणातायेत. मात्र, अद्याप तज्ज्ञांची समिती नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली आणि आंदोलन तीव्र झाल्यास त्याला फक्त सरकार जबाबदार राहील.”, असा इशाराही राणेंनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्र्यांसह तावडेंवरही निशाणा
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मराठा आरक्षणाचा अहवाल वाचावा. आर्थिक निकषांवर आरक्षण देणे शक्य नाही. मराठा लाथा खाणारे नाहीत, लाथ देणारे आहोत.”, असेही यावेळी राणे म्हणाले.
“ओबीसींच्या मोर्चात काहीच चुकीचं नाही”
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या छगन भुजबळांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावर राणेंना विचारले असता ते म्हणाले, “भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मोर्चा निघत आहे. यात काहीच चुकीचं नाही.”