मुंबई : अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त नारायण राणे यांनी फेटाळत, अशी कोणतीही भेट न झाल्याचे सांगितले. त्यानंतर आज राणेंनी माध्यमांशी संवाद साधत या सर्व घडामोडींवर स्पष्टीकरण दिले.
...तर केंद्रीय मंत्री झालो असतो : नारायण राणे
“मला रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या पक्षात येण्यासाठी मला विचारलं होतं. मात्र, मी नकार देऊन संधी हुकवली, नाहीतर आज केंद्रीय मंत्री असतो.”, असे नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं.
“मी काल अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही,” असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्याचं वृत्त फेटाळलं. अहमदाबादमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एकाच कारमध्ये प्रवास केल्याची दृश्य समोर आल्यानंतर नारायण राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणेंनी ही दृश्यं खोटी ठरवत कोणाशीही भेट झाली नसल्याचा दावा केला.
अहमदाबादेत वैयक्तिक काम
“अहमदाबादमधल्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती. मी रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही. त्यामुळे मीटिंग आटोपल्यानंतर अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रश्चच नाही,” असं राणेंनी सांगितलं.
“जर मी अमित शाह यांच्या घरी गेलो असं म्हणता, तर तिथला फोटो दाखवा. तिथून बाहेर पडतानाचा व्हिडीओ आहे का?” असा सवालही राणेंनी विचारला.