मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.
या भेटीला नारायण राणे यांनी दुजोरा दिला असला तरी चर्चा नेमकी कशावर झाली, याबाबत काहीही सांगितलेलं नाही. पोटनिवडणुकीबाबतची भूमिका पत्रकार परिषद घेऊन लवकरच जाहीर करु, असं त्यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे विधान परिषद पोटनिवडणूक लढवणार का, लढवली नाही तर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश कसा केला जाईल, याबाबत चर्चा सुरु असतानाच ही भेट घेण्यात आली. त्यामुळे या भेटीला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे.
राणेंना शिवसेनेचा विरोध कायम
दुसरीकडे नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला असलेल्या विरोधावर शिवसेना ठाम आहे. नुकतीच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात काय चर्चा झाली, त्याकडे लक्ष लागलं आहे.
महापौर बंगल्यावर 17 नोव्हेंबरला बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. पोटनिवडणूक आणि राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राणेंचा निर्णय अजून झालेला नसल्याचंही भाजपमधील सूत्रांचं म्हणणं आहे.