मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण याच जागेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत.
आता भाजपनं आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्त्या शायना एनसी आणि प्रसाद लाड या तिघांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मात्र यांच्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
भाजपने उमेदवार दिला, तरी शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय उमेदवार जिंकून येणं कठीण आहे. काल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चाही झाली. मात्र शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, शिवसेनेची भूमिका अद्याप समोर आली नसली, तरी नारायण राणेंच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे, हे उघड आहे.
पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
दरम्यान, पुढच्या काळातील पोटनिवडणुकीत राणेंना विधानपरिषदेत पाठवलं जाऊ शकतं. पण त्यामुळे राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेशही लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.