मुंबई : शिवथाळी कोण कुणाला देतं हे पाहूच, प्रसादाची परतफेड कशी करायची एवढं आम्ही शिकलो आहे. शिवसेनेतच शिकलो आहे. परतफेड योग्यवेळी कशी करायची हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही दिलेली थाळी व्हेज होती, तर नॉनव्हेज थाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे सांभाळा, असा इशारा नारायण राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी जुहू येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर निशाणा साधला.


राऊतांनी धमकीची भाषा करू नये
ज्यांनी कधी कुणाच्या कानशिलात लगावली नाही, त्यांनी धमकीची भाषा करू नये, असं सांगतानाच स्वत:ला सांभाळा असा इशारा राणे यांनी दिला. ज्यांनी महिलांवर अत्याचार केले. त्यांना सोडणार नाही. जो कुणाला थप्पड मारू शकला नाही तो उघड उघड धमक्या देतोय. मी इथेच थांबतो. बघू कोण कुणाला शिवथाळी देतोय. त्यांना राणे स्टाईलनेच भाजपकडून थाळी मिळेल. त्यात राणे असतील, राणे जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी देत नाहीत. महिलांवर ज्यांनी हात उचलले त्यांची नावं आमच्याकडे आली आहेत. त्यांना पाहून घेऊ. या लोकांना शिवथाळी दिल्याशिवाय स्वस्थ झोपणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.


तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी काय केलं?
शिवसेना भवनचा इतिहास राऊतांना माहित आहे काय? त्यावेळी शिवसेनेत तरी होतात का? तेव्हा तुम्ही ‘लोकप्रभात’ला काम करत होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत होता. त्यावेळचे अंक माझ्याकडे आहेत. तुम्ही शिवसेनाप्रमुखांवर कोणत्या भाषेत टीका केली ते 'प्रहार’मध्ये छापू का? असा इशाराही त्यांनी दिला. माझ्या सारख्या शिवसैनिकांनी स्वत: वर्गणी दिली आणि वर्गणीही जमवून दिली. तेव्हा शिवसेना भवन उभं राहिलं. तुमचं योगदान तरी काय? तुम्ही नोकरीला आला. तुम्ही कधी शिवसैनिक आणि नेता झालात हे सांगणार नाही. तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी काय केलं? असा सवालही नारायण राणे यांनी केला. वैभव नाईकने काही हल्ला केला नाही. तुमच्याकडे फुटेज असेल तर पाहा. उलट तो पळून गेला. तो कसला हल्ला करतोय, असंही ते म्हणाले.


मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं
आजची शिवसेना बाळासाहेबांचीही नाही आणि जुन्या शिवसैनिकांचीही नाही. ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची शिवसेना आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवणाऱ्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये, अशी टीकाही त्यांनी केली.


केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मौन
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळेल का? असा प्रश्‍न नारायण राणे यांना विचारला असता त्यांनी याबद्दल फारसं बोलणं टाळलं. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल केंद्रातील भाजपचे नेते निर्णय घ्यायला सक्षम आहेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना संधी मिळेल अशी गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात चर्चा आहे.