मुंबई : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी नाणार प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा केली. नाणार प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी स्थानिक नागरिकांना परत करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं.
तसेच जेथील नागरिक प्रकल्पाचं स्वागत करतील त्या ठिकाणी हा रिफायनरी प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, अशी माहिती सुभाष देसाईंनी दिली. नाणार प्रकल्प रद्द करावा अशी अट युतीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर ठेवली होती. त्या अटीची पूर्तता करत अखेर आज प्रकल्प रद्द करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नाणार प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला होता. तसेच शिवसेना सुद्धा या प्रकल्पाच्या विरोधात उभी राहिली होती. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे.
नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याचं जाहीर होताच रत्नागिरीत शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. तसेच रत्नागिरीकरांना पेढे वाटून आनंद साजरा केला. हा प्रकल्पग्रस्तांचा विजय असल्याचं सांगत आमदार राजन साळवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.