मुंबई : नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नाना पटोले यांनी कालच (4 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज काँग्रेसने पत्रक काढून नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.


सहा कार्यकारी अध्यक्ष


शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांडोरे आणि प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे.


दहा उपाध्यक्ष


शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश आनंदराव बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत प्रताप कांबळे, कैलास कृष्णराव गोरंट्याल, बी आय नगराळे, शरद आहेर, एम एम शेख, माणिक मोतीराम जगताप यांची उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.



काँग्रेसची नवी टीम, संपूर्ण यादी

टीम काँग्रेस, मराठवाडा
बसवराज पाटील - कार्यकारी अध्यक्ष
कैलास गोरंट्याल - उपाध्यक्ष
एम एम शेख - उपाध्यक्ष

टीम काँग्रेस, उत्तर महाराष्ट्र
कुणाल पाटील - कार्यकारी अध्यक्ष
शिरीष चौधरी - उपाध्यक्ष
शरद आहेर - उपाध्यक्ष

टीम काँग्रेस, पश्चिम महाराष्ट्र
प्रणिती शिंदे - कार्यकारी अध्यक्ष
मोहन जोशी - उपाध्यक्ष
रमेश बागवे - उपाध्यक्ष

टीम काँग्रेस, विदर्भ
शिवाजीराव मोघे - कार्यकारी अध्यक्ष
रणजीत कांबळे - उपाध्यक्ष

टीम काँग्रेस, कोकण
हुसेन दलवाई - उपाध्यक्ष
माणिकराव जगताप - उपाध्यक्ष

टीम काँग्रेस, मुंबई
मोहम्मद आरिफ नसीम खान - कार्यकारी अध्यक्ष
चंद्रकांत हांडोरे - कार्यकारी अध्यक्ष

काँग्रेसला एक क्रमांकाचा पक्ष करणार : नाना पटोले
काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करणार असल्याचा निर्धार नाना पटोले यांनी केला. ते पुढे म्हणाले की, "जिल्हा पातळीवर काही बदल करु. गटातटाचं राजकारण करणार नाही. पक्षात कोणीही नाराज नाही. मी जंस काम केलं तसं कोण करणार, असं इतरांना वाटतं हा माझा सन्मान आहे."


नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदी कोण? 


नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.


संग्राम थोपटे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात.त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रीपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.


सुरेश वरपूडकर हे पाथरीमधून निवडून आले आहेत . काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. ते परभणी लोकसभा मतदारसंघामधून 98-99 मध्ये खासदारही होते. अमीन पटेल यांनी हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे . मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे.