नालासोपाऱ्यात एटीएममध्ये पैसे भरताना 38 लाखांवर डल्ला
एबीपी माझा वेब टीम | 09 Jan 2019 08:00 AM (IST)
विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी नालासोपारा पश्चिमेकडील अॅक्सिस बँकेसमोरही, पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील पावणे तीन कोटी रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली होती.
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील गावराई पाडा इथे मंगळवारी (8 जानेवारी) दिवसाढवळ्या चोरी झाली. अॅक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील अंदाजे 38 लाख रुपयांची रोकड लुटून तीन ते चार चोरटे पसार झाले. गावराई पाडा इथे मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अॅक्सिस बँकमधील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी व्हॅन आली होती. कर्मचारी पैशांनी भरलेली बॅग घेऊन बॅंकेत जात असताना, तिथून अचानक दोन जण तोंडाला रुमाल लावून आले आणि त्यांनी त्यांच्यावर बंदूक रोखली. रिव्हॉल्वरमधून एक गोळी खाली पडली. त्यानंतर चोरट्यांनी कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या सुरक्षारक्षकावर रॉडने हल्ला करुन जखमी केलं. मग बॅग हिसकावली आणि कारमधून पळून गेले. चोरट्यांनी अंदाजे 38 लाख रुपयांची रक्कम लांबवल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अॅक्सिस बॅंकेच्या अवतीभोवती सुरक्षेची कोणतेही उपायोजना नव्हती. सीसीटीव्ही कॅमेर तसंच सुरक्षारक्षकही एटीएमसमोर नेमण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी नालासोपारा पश्चिमेकडील अॅक्सिस बँकेसमोरही, पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील पावणे तीन कोटी रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली होती. मात्र त्या गुन्ह्याचा छडा अजूनही लागला नाही.