मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एकीकडे औरंगाबाद, नागपूर, पुणे व इतर शहरांमध्ये काही ठिकणी लॉकडाऊन तर काही ठिकाणी कडक निर्बंध लावले जातायेत. मुंबईतही मागील काही दिवसांपासून वाढत जाणारी कोरोना रुग्णसंख्या आता दिवसाला 1500 च्या जवळपास पोहचली आहे. त्यामुळे मुंबईत कडक निर्बंध लागणार का? की मुंबई अंशतः लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे?


मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच मुंबईतील रुग्णांची संख्या दिवसाला दीड हजारांवर गेली आहे. त्यामुळे मुंख्यमंत्र्यांनी आणि महापौरांनी मुंबईत काही प्रमाणात निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत.


एकीकडे महापौर जरी मुंबईत रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर अंशतः लॉकडाऊनबाबत बोलत असल्या तरी प्रशासनाकडून याबाबत विचार नसल्याचं सांगितले गेलं आहे. मुंबईतील परिस्थिती बघता सध्यातरी रुग्णसंख्या वाढत असल्याने काहीशी चिंतेची बाब असली तरी अंशतः लॉकडाऊन लावण्याची गरज नसल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं आहे. 


मुंबईत लॉकडाऊन नाही कारण..



  • मुंबईतील कोविड चाचण्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा 6 टक्क्यांवर आहे.

  • तोच नाशिक आणि पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 15 टक्के आहे. तर विदर्भात 25 टक्के आणि काही ठिकाणी तो 50 टक्क्यांवर गेला आहे.

  • मुंबईतील मृत्यूदरही कमी झाला असून तो 4.1 टक्कांवर आला आहे. त्याचसोबत मुंबईत लक्षणविरहीत रुग्णांची संख्याही जास्त आहे. मोठ्या इमारतींमध्ये हे रुग्ण आढळत आहेत. 

  • पालिका प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्याची गरज नसल्याचं जरी सांगितलं जात असलं तरी नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याचंही बघायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन जर लागला आणि व्यवसाय ठप्प झाले तर त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्न आहे.


प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी मुंबईत घेतली जात असल्याचं सांगण्यात जरी येत असलं तरी राजकारणी आणि प्रशासनामध्ये एकवाक्यता नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मुंबईत लॉकडाऊन होईल का? याची चिंता सतावते आहे. मात्र, मुंबईकरांनी कोरोनाचे नियम योग्यरितीने पाळल्यास आणि योग्य ती खबरदारी घेतल्यास आपण सगळे मिळून पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणात आणू शकतो आणि लॉकडाऊनचं संकट टाळू शकतो.