मुंबई : मुंबईत 21 टक्के मुस्लिम आहेत आणि मुंबई महापालिकेचं बजेट हे 37 हजार कोटी रुपये इतकं आहे. त्यामुळे जर एमआयएमला मतं दिली, तर मुस्लिम वार्डात 7 हजार 770 कोटी रुपये खर्च करेन, असं दावा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.


मुंबईतील नागपाडामध्ये काल एमआयएमच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी असदुद्दीन ओवेसी बोलत होते. मुंबईतील मुस्लीम समाजाला त्यांच्या लोकसंख्येएवढाच निधी देण्याचं आश्वासन ओवेसी यांनी यावेळी दिलं.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, "मुंबई महापालिकेचं बजेट 37 हजार कोटी रुपये आहे आणि 21 टक्के मुसलमान आहेत. जर आपण महापालिकेला पैसा देत आहोत तर महापालिकेचीही जबाबदारी आहे की मुस्लीम परिसरातही त्या पैशांचा वापर करायला हवा. हा आपला घटनात्मक अधिकार आहे. बीएमसीमध्ये एमआयएमचे 20 ते 25 नगरसेवक निवडून द्या. शिक्षण, रुग्णालय, पाणी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी 7770 कोटी रुपये मुंबई महापालिकेच्या मुस्लीम वॉर्डमध्ये खर्च केले जातील, असं वचन एमआयएम तुम्हाला वचन देत आहे."

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आजच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जात, धर्म, भाषा अशा कोणत्याही आधारावर मत मागणं हे बेकायदेशीर असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सात खंडपीठाच्या न्यायाधीशांनी 4-3 अशा बहुमताने हा निर्णय दिला.

पाहा व्हिडीओ