वसई : वसईत राहणाऱ्या एका व्यक्तीला सोसायटीत रुम विकत घेण्यास नकार दिला आहे. केवळ मुस्लीम असल्याच्या कारणावरून सोसायटीने हरकत घेतली आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी देखील या प्रकाराविरोधात तक्रार घेण्यास नकार दिला आहे.
विकार खान यांनी नुकताच वसईच्या साईनगर परिसरातील हॅप्पी जीवन या इमारतीती एक फ्लॅट विकत घेतला. त्यासाठी त्यांनी पैसे देखील जमवायला सुरुवात केली. मात्र, आता या सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी यावर हरकत घेतली असून, विकार खान यांना फ्लॅट देण्यास नकार दर्शवला आहे. केवळ मुस्लीम असल्याने पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांचा नकार
विशेष म्हणजे सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी एक ठराव करून एक विरोधाच पत्र देखील त्यांना दिले आहे. या इमारतीत या आधीही दोन मुस्लीम कुटुंब राहत आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर जैन आणि गुजराती लोकांची वस्ती असल्याने हा विरोध होत आहे. या बाबत रूम विकणाऱ्या एका गुजराती व्यक्तीने सोसायटीला विचारणा केली असता त्यांनी मुस्लीम लोक उपद्रव माजवत असल्याच त्यांना सागितले आहे .
या विरोधात माणिकपूर पोलीसांमध्ये तक्रार करायला गेल्यावर पोलिसांनी साधी तक्रार देखील लिहून घेतली नाही. आता याविरोधात आवाज उठवणार असल्याच देखील खान यांनी सांगितले आहे.