मुंबई: 'शाळेत असल्यापासून पुस्तकातील कवितांना चाली लावायचो. त्यावेळी बेंच वाजवून आम्ही कविता म्हणायचो. जेव्हा 'राणी माझ्या मनात घुसशील का' या गाण्याला चाल लावत असताना अचानक बेंच वाचवण्याचा तो 'नाद' मला आठवला अन् डिपांडी डिपांग या गाण्यात आलं. आज लोकं डिपाडी डिपांग म्हणूनच हे गाणं ओळखतात.' असं म्हणत संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी डिपाडी डिपांगची कहाणी सांगितली.
दिवाळीनिमित्त माझा कट्ट्यावर आलेल्या सलील कुलकर्णींनी आपल्या अनेक गाण्यांचा प्रवास इथं उलगडला.
'वाचन ही मला मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती'
'वाचन ही मला मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती आहे. वाचनामुळेच खरं तर मला संगीताची ओढ लागली. खरं तर शब्दांचं महत्व सुधीर मोघे, शांताबाई शेळके यांच्यामुळे समजू लागलं.' असं सलील कुलकर्णी म्हणाले.
'मराठी गाण्यांनी तरुणाईला भुरळ घातली'
'एक वेळ अशी होती की, मराठी गाणी म्हणजे ज्येष्ठांनी ऐकायची अशी समजूत झाली होती. यावेळीच मराठीत अनेक असे कवी आणि संगीतकार पुढे आले की, त्यांनी तरुणाईला आपल्या कवितांनी आणि गाण्यांनी आकर्षित केलं. संदीप खरे, मिलिंद इंगळे यांच्यापासून अजय-अतुल यांनी तरुणाईला आपल्या गाण्यांनी भुरळ घातली.'