Anil Deshmukh : मुंबई उच्च न्यायालयानं मंजूर केलेल्या जामीनाच्या आधारावर अनिल देशमुखांनी गुरूवारी तातडीनं मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दखल केला आहे. याची दखल घेत कोर्टानं सीबीआयला 14 ऑक्टोबरपर्यंत यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मनी लॉड्रिंग आणि पदाचा गैरवापर करत आर्थिक भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात गेल्या वर्षभरापासून अटकेत  असलेल्या अनिल देशमुखांना अखेर हायकोर्टानं सुटकेची आशा दाखवली आहे. ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. मात्र याचप्रकरणी सीबाआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप अटकेत असलेल्या देशमुखांना सुटकेसाठी सीबीआयच्या केसमध्येही जामीन मिळवण अनिवार्य आहे. 


अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याच एफआयआरवर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी देशमुखांवर ईसीआयआर दाखल करण्यात आला आणि त्यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी ऐन दिवाळीच्या तोंडावर अटक करून त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून देशमुख सुमारे वर्षभर मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातच आहेत. 


सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुखांना 4 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. मात्र, सीबीआयकडूनही याच खंडणी प्रकरणी त्यांची चौकशी सुरु असल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नाही. जोपर्यंत सीबीआयकडून त्यांना जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही, म्हणूनच सीबीआय न्यायालयानेही आपल्याला जामीन मंजूर करावा यासाठी अनिल देशमुखांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. ईडीने त्यांना ज्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे त्याच प्रकरणाची सीबीआयकडूनही चौकशी सुरु आहे. त्यामुळे सीबीआय न्यायालयानेही आपल्याला जामीन द्यावा, अशी मागणी देशमुखांनी आपल्या जामीन अर्जातून केली आहे. त्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने सीबीआयला अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनिल देशमुख यांना जामीन मिळण्याची शक्यता वाढली आहे.


आणखी वाचा -


Anil Deshmukh Chronology : परमबीर सिंह यांचे आरोप, ईडीचं समन्स आणि अनिल देशमुख यांना अटक ते जामीन- पाहा संपूर्ण घटनाक्रम
Anil Deshmukh यांची जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात धाव