Anil Deshmukh Chronology : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) यांची अखेर उद्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून सुटका होणार आहे. अनिल धेशमुख यांना मिळालेल्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची (CBI) मागणी मुंबई उच्च न्यायालयानं (High Court) फेटाळून लावली आहे. त्यामुळे जवळपास एक वर्षानंतर अनिल देशमुख तुरूंगाबाहेर येणार आहेत. 1 नोव्हेंर 2021 रोजी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 12 डिसेंबर 2022 रोजी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु, सीबीआयच्या विरोधानंतर त्यांच्या जामीनाला स्थगिती दिली होती. अखेर 17 दिवसांच्या स्थगितीनंतर आज न्यायालयाने सीबीआयची मागणी फेटाळून लावत देखमुख यांच्या जामीनावरील स्थगिती उठवली.  सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुख यांची सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप, ईडी-सीबीआयची कारवाई, अटेक ते जामीन याबाबत जाणून घेऊयात... 


Anil Deshmukh Chronology :  11 महिन्यानंतर जामीन मंजूर 


तब्बल 11 महिन्यानंतर 12 डिसेंबर रोजी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला होता. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 12 डिसेंबर रोजी जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआयच्या विरोधानंतर 18 दिवसांनी ते तुरूंगातून बाहेर येतील. मार्च 2021 मध्ये त्यांच्यावर 100 कोटी रुपये वसूलीचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. 


Anil Deshmukh Chronology :  परमबीर सिंह यांचे आरोप, ईडीचा समन्स आणि अनिल देशमुख यांना अटक ते जामीन- पाहा संपूर्ण घटनाक्रम


मार्च 2021 -  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. यामध्ये परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप लावले होते. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटींची खंडणी जमा करायला सांगितल्याचा आरोप या पत्रात होता. 


5 एप्रिल 2021 : तत्कालीन विरोधी पक्षानं वारंवार महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यामुळे 5 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 


10 मे 2021 : परमबीर सिंह यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 


26 जून 2021 : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीकडून अनिल देशमुख यांना पहिला समन्स पाठवण्यात आला. 


29 जून 2021 : अनिल देशमुख यांना ईडीकडून दुसरा समन्स पाठवण्यात आला. 


5 जुलै 2021 : ईडीकडून अनिल देशमुख यांना तिसरं समन्स जारी करण्यात आलं.


16 जुलै 2021 : अनिल देशमुख यांना ईडीनं चौथं समन्स पाठवलं. 


17 ऑगस्ट 2021 : अनिल देशमुख यांना ईडीने पाचवं समन्स पाठवलं. 


2 सप्टेंबर 2021 : ईडीचं समन्स  रद्द करण्यासाठी देशमुख यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. 


29 ऑक्टोबर 2021 : अनिल देशमुख यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली. 


दरम्यान, अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काही काळ नॉटरिचेबल होते. त्या कालावधीत ईडीने त्यांना वारंवार समन्स बजावले. अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण देशमुख यांची याचिका फेटाळण्यात आली. अखेर एक नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. दोन नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजता ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार यांनी अनिल देशमुख यांना अटक केली. 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना ईडी कोठडी सुनावली. 


Anil Deshmukh Chronology : अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर टाच 


पाच वेळा समन्स पाठवल्यानंतरही अनिल देशमुख ईडीपुढे चौकशीला हजर झाले नव्हते. ईडीनं त्यांच्यावरील कारवाईचा धडाका सुरुच ठेवला होता. अनिल देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले, तर अनिल देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली.  दरम्यान, अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती.


अनिल देशमुख यांची तुरुंगात रवानगी झाली. त्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केलं. अनिल देशमुख यांनीही वारंवार जामिनासाठी अर्ज केला होता. याच कालावधीत त्यांच्याविरोधात सीबीआयनेही कारवाई केली. अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईत आज जामीन मंजूर केला आहे. पण त्यांची सुटका होणार नाही. सीबीआयच्या दाखल गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख लवकरच जामीनासाठी अर्ज करतील. तुर्तास त्यांना सध्या थोडा दिलासा मिळाला आहे. 


Anil Deshmukh Chronology : अनिल देशमुखांमार्फत कोर्टात वारंवार काय युक्तीवाद?


पीएमएलए न्यायालयानं 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं होतं. प्रकृती अस्वस्थाचं कारण दिलं होतं. तसेच वाढतं वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती देशमुखांकडनं करण्यात आली. अनिल देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांना कोविड 19 ही होऊन गेलाय, या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्यानं त्यांना सतत आधार आणि दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून रहावं लागतंय. त्यामुळे मनवतेच्या भावनेनं जामिनावर सोडण्याची विनंती देशमुखांनी हायकोर्टाकडे करण्यात आली होती.