शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला काल रात्री बोलवून शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भविष्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचं लांडेंनी सांगितलं, असं संजय तुर्डे म्हणाले. मात्र मी राजसाहेब ठाकरेंसोबत प्रामाणिक आहे, असं तुर्डेंनी स्पष्ट केलं.
गेल्या एका महिन्यापासून हे प्रकार सुरु असल्याचा दावा तुर्डेंनी केला आहे. दिलीप लांडेंनी महिनाभरापूर्वी यासंदर्भातली चाचपणी केली होती, असंही ते म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.
कोण आहेत संजय तुर्डे?
संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संजय तुर्डे आपल्या कार्यकर्त्यांसह घराबाहेर जल्लोष साजरा करत होते. परंतु याचवेळी संजय तुर्डे आणि 20 ते 25 कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. ज्यात तुर्डे यांच्यासह पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी हल्ला केल्याचा आरोप संजय तुर्डे यांनी केला होता.