मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच पाणी भरतानाच्या धावपळीत एकाचा मृत्यू झाला आहे. विक्रोळी पार्कसाईटमध्ये रात्री 15 मिनिटं येणारं पाणी भरण्याच्या गडबडीत तरुणाला जीव गमवावा लागला.


पाणी भरायला जाताना काळोखात पाय घसरुन 32 वर्षीय सुनील देठेचा मृत्यू झाला. विक्रोळीतल्या डोंगराळ वस्तीत पाणी माफिया सक्रिय आहेत. पालिका प्रशासन काही ठिकाणी रात्री 11 तर काही ठिकाणी पहाटे 3 वाजल्यानंतर पाणी सोडतं. यामुळे नागरिकांना अंधारात पाणी भरावं लागतं.

रस्त्यांची दुरवस्था आणि गल्ली बोळातील पथदिवे बंद असल्यामुळे रहिवासी अनेकदा पाणी भरताना गैरसोय होत असल्याची तक्रार करतात. मात्र ही गडबड आता एकाच्या जीवावर बेतल्याने ही समस्या गंभीर झाली आहे.

दरम्यान, पालिकेच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, रात्री पाणी सोडण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल स्थानिक विचारत आहेत.