फटाका हातात फुटून छातीवर धडकला, मुंबईत तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2016 11:00 AM (IST)
मुंबई : फटाका हातात धरुन फोडताना मुंबईतील एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. लोखंडी रॉडवर धरुन पेटवलेला फटाका छातीवर आदळल्याने अँटॉप हिल परिसरात एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. 'मि़ड डे' वर्तमानपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. अफझल आणि त्याच्या मित्रांनी एका जत्रेत हाताने तयार केलेला फटाका पेटवला. त्याचवेळी हा फटाका छातीवर उडून आला आणि त्याच्या हृदयाला छेदून गेला. यामध्येच अफझलचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अफझलच्या कुटुंबीयांना हा अपघात नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. फटाका फुटल्याने नाही, तर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे अफझलचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी मात्र कुटुंबीयांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पोस्टमॉर्टमसाठी अफझलचा मृतदेह सायन रुग्णालयात नेल्यानंतर अफझलच्या कुटुंबानी रुग्णालय परिसरात गोंधळ घातला.