मुंबई : स्वतःच्या देखभाल खर्चासाठी सक्षम असलेल्या वर्किंग वुमन अर्थात कमावत्या महिलेला विभक्त जोडीदाराकडून पोटगीची आवश्यकता नाही, असं मुंबई हायकोर्टाने बजावलं आहे. टीव्ही अभिनेत्रीने अभिनेत्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर देखभाल खर्चाची मागणी केली होती.


संबंधित टीव्ही अभिनेत्रीला फॅमिली कोर्टाने अंतरिम देखभाल खर्च नाकारला होता. याविरोधात केलेल्या याचिकेवर जस्टीस आर एम सावंत आणि साधना जाधव यांच्या खंडपीठाने सुनावणी केली.

2010 मध्ये अभिनेत्रीचा घटस्फोट झाला. तेव्हापासून पतीने आपल्याला देखभाल खर्च दिलेला नाही. हे लक्षात घेऊन घटस्फोट प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पतीने दरमहा 50 हजार रुपये द्यावे, अशी मागणी तिने फॅमिली कोर्टाकडे केली होती.

तिच्या अभिनेत्या पतीने या मागणीला विरोध दर्शवला होता. '2005 ते 2010 या कालावधीत आपण बालाजी टेलिफिल्म्ससोबत काही मालिकांमध्ये काम केलं असलं, तरी त्यानंतर आपली मिळकत स्थिर नाही. जेव्हा असाईनमेंट मिळेल, तेव्हा आपण काम करतो' असा दावा पतीने केला. 'आम्ही एकत्र असताना सगळे खर्च मी करायचो. तिचे आई-वडिल आणि पाळीव प्राण्यांवरही मी खर्च केला' असं पतीने सांगितलं.

अभिनेत्रीने मात्र आपल्याकडे सध्या मालिका किंवा चित्रपटातील कोणतंही काम नसल्याचं कोर्टाला सांगितलं. पैसे नसल्यामुळे वृद्ध माता-पित्यांवर अवलंबून रहावं लागतं, असंही ती म्हणाली. पतीने नुकताच तेलगू चित्रपट साईन करुन खूप पैसे कमावल्यामुळे आपल्याला देखभाल खर्च द्यावा, अशी मागणी तिने केली.