मुंबई : बलात्काराचे खोटे आरोप करुन ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एका लेडी डीजे (डीस्क जॉकी)ला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून सर्वसामान्यांकडून पैसे लाटणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटच्या तळाशी जाण्यात पोलिसांना यश आलं आहे.


डिसेंबर 2016 मध्ये राजस्थान पोलिसांच्या एका विशेष पथकाने आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीतील एखादी तरुणी पुरुषासोबत संमतीने शारीरिक संबंध ठेवायची. या खाजगी क्षणांचं चित्रीकरण केलं जायचं.

त्यानंतर बलात्काराचे आरोप करण्याची भीती घालून त्या व्यक्तीकडून पैसे उकळले जायचे. अशाप्रकारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून या टोळीने 15 कोटी रुपये लाटल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून संबंधित 21 वर्षीय डीजे तरुणीचा शोध पोलिस घेत होते. अखेर मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेतील पोलिसांनी तिला अटक केली. या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींचा आकडा 32 वर पोहचला आहे.

मुंबईतील डॉ. सुनित सोनी यांनी डीजे तरुणीविरोधात तक्रार दाखल केली होती. मार्च 2016 मध्ये दोघं पुष्करमधील एका रिसॉर्टमध्ये राहिले होते. तिथून जयपूरला आल्यावर तिने साथीदाराच्या मदतीने डॉक्टर सोनींकडे एक कोटी रुपयांची मागणी केली.

सोनींना ही रक्कम देता न आल्याने तिने त्यांच्यावर बलात्काराचा खोटा आळ लावल्याचं सांगितलं जातं. डॉ. सोनी यांना 78 दिवसांपासून तुरुंगात होते.