मुंबई : पतीने बेडरुममध्ये मित्रासोबत रंगेहाथ पकडल्याने महिलेने मित्रावर थेट बलात्काराचा आरोप केला आहे. परस्परसंमतीने ठेवले गेलेले शारीरिक संबंध पतीला समजल्यामुळे महिलेने मित्राचा विश्वासघात केला.
संबंधित 30 वर्षीय महिला पती, दोन मुलं, सासू-सासरे आणि नणंदेसोबत राहते. मुंबईतील मालाड पूर्व भागात दफ्तरी मार्गावर भाड्याच्या घरात हे कुटुंब राहतं. एका रात्री महिलेचा पती घराबाहेर पडला, मात्र काहीतरी विसरल्यामुळे तो काही वेळातच परत आला.
घरात शिरताच त्याला एक अनोळखी इसम त्याच्या बेडवर आढळला. पतीला पाहताच महिलेने आरडाओरड केली आणि संबंधित इसम आपल्यावर बलात्कार करत असल्याचं तिने पतीला सांगितलं. पतीनेही त्याला धरुन चोप दिला, मात्र त्याने तावडीतून निसटून कपडे घेऊन पोबारा केला.
सासू-सासरे वरच्या मजल्यावर झोपले होते, तर आपण पतीसाठी दरवाजा उघडा ठेवून झोपलो होतो. त्याचवेळी एक अनोळखी इसम घरात घुसला, असं महिलेने पोलिसांना केलेल्या तक्रारीत म्हटलं.
महिलेच्या जबाबानुसार पोलिसांनी कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
महिलेच्या शेजाऱ्यांनी आपण कथित आरोपीला ओळखत असल्याचं सांगितलं. संबंधित इसमाचं महिलेकडे नियमित येणं-जाणं असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र त्याचा शोध अद्याप सुरु आहे.