मुंबई : मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकावर एक तरुण युवतीकडे पाहून हस्तमैथुन करत असल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. युवतीने धाडसाने त्याचं गैरकृत्य व्हिडिओत कैद केलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रेल्वे पोलिसांकडे तिने मदत मागितल्यानंतरही पोलिसांनी त्याला सोडून दिलं.


'माझा'च्या बातमीची तातडीने दखल घेत पोलिसांनी कारवाई केली आणि आरोपीला अटक केली. अशोक प्रधान याला तब्बल दहा दिवसांनी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

29 जून रोजी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सीएसटी स्थानकावर एका तरुणीसोबत हा प्रकार घडला.

तरुणीने मोठ्या हिमतीने हा प्रकार व्हिडिओत कैद केला आणि सोशल मीडियावर शेयर केला. मात्र पोलिसांकडे मदत मागूनही त्यांच्याकडून कुठलीच मदत मिळाली नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं?

एक तरुणी काही कामानिमित्त नाशिकला जात होती. यावेळी सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर उभ्या असलेल्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये संंबंधित तरुण तिच्याकडे रोखून पाहत हस्तमैथुन करताना तिला दिसला.

सीएसटीवरुन ही ट्रेन सकाळी सव्वासहाला निघते. ती वेळेच्या आधीच तिथे पोहोचली होती. ट्रेन सुटायला काही मिनिटांचा अवधी असल्याने ट्रेनमधले दिवे बंद होते. तेव्हा अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे पाहून या तरुणाने अश्लील चाळे करायला सुरुवात केली.

तरुणी तिच्या मैत्रिणीची वाट बघत प्लॅटफॉर्मवरच उभी होती. तेव्हा तिला पाहताच या तरुणाने पँटची झिप उघडली आणि तिच्यादेखतच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे घाबरलेली तरुणी दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्या समोर असणाऱ्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि अश्लील चाळे करु लागला.

तिने त्याचा व्हिडिओही काढला. कदाचित आपल्याला आलेल्या वाईट अनुभवावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून पुरावा म्हणून तिने याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं.

ज्यावेळी तरुणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार द्यायला गेली, त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओ बघून तिची खिल्ली उडवली. एक पोलिस तिच्यासोबत आला, मात्र त्यानेही तरुणीलाच तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत तो तरुण तिथून पळून गेला होता. एकप्रकारे रेल्वे पोलिसांनी त्याला सोडून दिल्यामुळे तिने संताप व्यक्त केला आहे.

गेल्याच आठवड्यात मुंबईतील लोकलमध्ये असाच प्रकार घडला होता. शेजारच्या कम्पार्टमेंटमधील महिलेकडे पाहून एक तरुण हस्तमैथुन करत असल्याचं समोर आलं होतं.

पाहा व्हिडिओ :