मुंबई : मुंबईतील वांद्रे भागातल्या खेरवाडीत झालेल्या हत्याकांडाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला नाशकातून बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी नाशकातील एका नातेवाईकाच्या घरी पैसे आणण्यासाठी गेले असताना पोलिसांनी आरोपीला अटक केली.

वांद्र्याच्या खेरवाडी परिसरातल्या गव्हर्मेंट कॉलनीतल्या इमारत क्रमांक 3 मध्ये राहणाऱ्या सचिन नावाच्या युवकाची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. राहत्या इमारतीच्या गच्चीवर त्याचा गळा चिरुन निर्घृणपणे ठार मारण्यात आलं होतं.

पत्नी सोनालीच्या जबानीत असंबद्धता आढळल्यामुळे पोलिसांना तिच्यावर सुरुवातीपासून संशय होता. तिचे फोन रेकॉर्ड तपासल्यावर तासनतास ती एका क्रमांकावर बोलत असल्याचं पोलिसांना समजलं. त्याचा माग काढल्यावर हा क्रमांक त्याच परिसरात राहणाऱ्या चेतन नावाच्या युवकाचा असल्याची माहिती समोर आली.

घटनेनंतर चेतन फरार असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. चेतनचा फोन बंद होता, तर संशयातून पोलिसांनी मयत सचिनची पत्नी सोनालीला ताब्यात घेतलं होतं. चौकशीत जी माहिती समोर आली, त्यामुळे पोलिसही अवाक झाले.

सचिन आणि चेतन हे अत्यंत जवळचे मित्र होते. चेतनची सचिनच्या घरी ये-जा सुरु होती. सचिनचा चेतनवर पूर्ण विश्वास होता, मात्र चेतनचं सोनालीशी सूत जुळलं. दिवसा सचिन कामावर गेला, की नाईट ड्युटी करणारा चेतन सोनालीकडे यायचा. शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून चेतन-सोनालीविषयी कळल्यावर सचिनने बायकोला जाब विचारला.

सोनाली मात्र चेतनच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. सचिनचा काटा काढला, तरच आपण तुझ्याशी लग्न करु, असं आश्वासन सोनालीने चेतनला दिलं. सोनालीवरील प्रेमापोटी चेतनने आपला जिवलग मित्र सचिनचाच जीव घेतला.

29 मे रोजी चेतनने सचिनला दारु पिण्यासाठी बोलावून गच्चीवर नेलं. सचिन मद्याच्या अंमलाखाली आल्यावर चेतनने त्याची गळा चिरुन हत्या केली. हत्येनंतर चेतन शिर्डीला गेला. साईबाबांचं दर्शन घेऊन त्याने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. आपलं प्रेम सफल व्हावं, यासाठी त्याने देवाला साकडं घातलं.

त्याने महाराष्ट्र पालथा घातला, मात्र महिन्याच्या आतच त्याचे पैसे संपले आणि त्याने एका नातेवाईकाकडे आर्थिक मदत मागितली. त्यावेळी एका हॉटेलमध्ये पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.