मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. कोकणात सिधुदुर्ग, रत्नागिरी इथं उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तर, इथं मुंबईतही उन्हाळा जाणवू लागल्यामुळं नागरिक बेजार झाले आहेत. हवामान खात्याच्या वतीनं ट्विट करत के.एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईचा पारा शनिवारी दुपारच्या सुमारास 40 अंशांवर पोहोचला असून, पुढच्या काही तासांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 


मार्च महिन्याच्या 27 तारखेलाच तापमान थेट 40 अंशांवर पोहोचलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच 41.7 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद 1956च्या सुमारास करण्यात आली होती. ज्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा अधिक प्रमाणात जाणवू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राजस्थान कडून महाराष्ट्राच्या दिशेनं जे कोरडे वारे वाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी दिली आहे. काल कोकणातील काही शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सियस पर्यत पोहचल्याची माहिती सरकार यांनी दिली आहे. त्यामुळे शक्यतो दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडू नका, चेहरा झाकण्यासाठी रुमालाचा वापर करा, भरपूर पाणी प्या असं आव्हान सरकार यांनी केलं आहे.


के.एस. होसाळीकर यांनी मुंबईच्या तापमानाची माहिती देण्यासोबतच सर्वांना या दरम्यानच्या काळात काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. पुढील काही दिवसही उकाडा असाच कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं उन्हाचा दाह आता अडचणीचा विषय ठरत आहे. 


 






मुंबईत कोरोना लसीकरणाचा 10 लाखांचा टप्पा पार, महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये 70 टक्के लसीकरण


मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. येत्या काळात मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे, त्यामुळं तब्येत जपत नागरिकांनी उन्हातून घराबाहेर पडू नये असाच सल्ला देण्यात येत आहे.




अवकाळी पावसाचे ऋतूचक्रावर परिणाम 


काही दिवसांपासून देशात आणि राज्यातही अनेक ठिकाणांवर अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. याचेच थेट परिणाम ऋतूचक्रावर होताना दिसत आहेत. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर उत्तर भरातातही उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाल्याचं कळत आहे. यातच हवामान खात्याच्या माहितीनुसार देशातील पूर्वेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये 29 मार्च ते 2 एप्रिल या काळात पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.