मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीच्या परिसरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा उकाडा (Heat Wave) कधी कमी होणार, याची अनेकजण वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील (Mumbai) तापमानात रविवारीही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे हवेतील उकाडा कायम राहील. तसेच कमाल तापमान (Mumbai Temperature) 36 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वी मुंबईत जोरदार पाऊस पडला होता. मात्र, काहीवेळासाठी पडलेल्या पावसाने मुंबईच्या हवेतील आद्रर्ता वाढायला सुरुवात झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या हवेत आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे हवेतील उकडा मोठ्याप्रमाणावर वाढला आहे.  मुंबईत शनिवारी कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत होता. यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. ही परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी वातावरण उष्ण आणि दमटच राहील. त्यामुळे दोन्ही दिवस नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

मुंबईत शनिवारी किती तापमान होते?

मुंबईतील कुलाबा केंद्रात शनिवारी 34.4 अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात 34.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

मराठवाड्यात वीज आणि गडगडाटासह पाऊस

हवामान विभागाने जालना, बीड, नांदेड, धारशिव आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागांत रविवारी विजा आणि गडगडाटासह पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारपासून ते पुढील चार ते पाच दिवस विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मान्सून महाराष्ट्रात कधी येणार?

राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वादळी पाऊस झाला आहे. मात्र, मान्सून देशात आणि महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या तारखेला दाखल होणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. साधारण 20 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतील. त्यानंतर 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल. यानंतर सर्वकाही सुरळीत राहिल्यास 6 जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आणखी वाचा

पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन