Mumbai Water Cut:  मुंबईकरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे. 31 मार्चपासून मुंबईत 30 दिवस पाणीकपात (Water Cut) लागू होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही पाणीकपात लागू करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेने (BMC) सांगितले आहे. ही पाणीकपात मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याला लागू असणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहचली. त्यामुळे पाणी गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. या कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढील 30 दिवस 15 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे शहराला (Thane City) पुरवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याला देखील ही कपात लागू राहणार आहे.


पाणीकपातीचा निर्णय का?


मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई शहर व उपनगराच्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे 65 टक्‍के पाणीपुरवठा हा भांडुप संकूल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा 75 टक्‍के पाणीपुरवठा मुख्‍यत्‍वे 5500 मिलीमीटर व्‍यासाच्‍या 15 किलोमीटर लांबीच्‍या जलबोगद्याद्वारे होतो. या जल बोगद्यास ठाणे येथे कूप‍नलिकेच्‍या खोदकामामुळे हानी पोहचली. या हानीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामुळे ही पाणी गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्‍तीसाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणे व दरम्‍यानच्‍या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचविणे आवश्‍यक आहे. पर्यायी पाणीपुरवठा व्‍यवस्‍था कार्यान्वित करण्‍यासाठी काही अत्‍यावश्‍यक बदल करणे गरजेचे झाले असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यामुळे वहन व्‍यवस्‍थेत बदल सुरु असताना व जलबोगदा दुरुस्‍तीच्या काळात मुंबई शहर आणि उपनगराचा पाणीपुरवठा बाधित होणार आहे. त्याशिवाय, पर्यायी व्‍यवस्‍थेला देखील काही तांत्रिक कारणास्‍तव पूर्ण क्षमतेने वापरासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे सध्‍या भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्‍या प्रमाणाइतके पाणी पोहचविणे व प्रक्रिया करणे शक्‍य होणार नाही असे मुंबई महपालिकेने सांगितले आहे.


मुंबई शहर व उपनगर परिसरातील नागरिकांनी पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.