Mumbai : संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी तसेच याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबईतील वझे (मुलुंड) कॉलेजच्या संस्कृत विभागामार्फत 'ध्रुवा' संस्कृत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 24 सप्टेंबर रोजी (काल) आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं यंदाचं हे सातवं वर्ष होतं. यावेळी मराठी अभिनेत्री, निवेदिका डॉ. समिरा गुजर-जोशी (Samiksha Gujar) तसेच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु होते. मात्र, आता विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये पुन्हा एकदा नवी ऊर्जा निर्माण व्हावी. या उद्देशाने “ध्यानम् आदिशक्तेः” ही संकल्पनेवर आधारित महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या संकल्पनेवर आधारित खजिनाशोध, नाटक, प्रश्नमंजुषा कथाचित्र, कथाकथन अशा खेळांच्या माध्यमातून संस्कृत साहित्यातील देवीरूपांचा अभ्यास व्हावा असा मानस होता. तसेच, गायन, नृत्य आणि चर्चासत्र ऑनलाईन असल्याने गोवा, नागपूर, औरंगाबाद, चेन्नई इ. विविध भागातून संस्कृत प्रेमी सहभागी झालेले होते.
यावेळी वैचित्री अवलेखामधे सहभागी झालेल्या मुलांना दोरे, कापूस आणि शेल्स यांपैकी काहीतरी वापरून चित्र सजवायचे होते. आणि त्याला समर्पक संस्कृत शीर्षकही द्यायचे होते. मुलांच्या कल्पक कलाविष्कारांचे यावेळी दर्शन घडले. क्विझ, कथाकथन, नाटुकली तर सर्व छानच सुरू होते. रिसर्च पेपर, नृत्य आणि संगीत अशा काही स्पर्धा व्हिडीओ माध्यमातूनही झाल्या होत्या. संपूर्ण महोत्सव अगदी नियोजनबद्ध पणे पार पडला. यावेळी सर्व स्पर्धांमधील विजेते आणि ‘सर्वोत्कृष्ट सहभागी शाळा आणि महाविद्यालय’ अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेच्या शेवटी फर्जंद सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी पावनखिंड- फर्जंद सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर उपस्थित रहातील. यावेळी सर्व स्पर्धांमधील विजेते व ‘सर्वोत्कृष्ट सहभागी शाळा आणि महाविद्यालय’ अशी पारितोषिके दिली जातील.
आगामी पिढीला संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी. तसेच, या भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा महोत्सव पार पडला.