Mumbai Vaccination : मुंबई महापालिकेनं गेल्या आठवड्यात महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवलं होतं. या विशेष सत्राला महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी विशेष लसीकरण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्या वतीनं आज, सोमवार (27 सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवलं जाणार आहे. यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या पार्श्वभूमीवर आजसाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.


कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगानं आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र आज सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत राबवलं जाणार आहे.



मुंबईतील सर्व 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयं आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणानं, आज साठीची प्रचलित ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.


दरम्यान, मुंबईत 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरु आहे. महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 37 लाख 46 हजार नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यामध्ये महिलांचं प्रमाण पुरुष लाभार्थ्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे महिलांना लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालिका प्रशासनानं महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 


17 सप्टेंबर रोजी पहिल्या वेळेस ही मोहीम राबविली असता पालिका आणि सरकारी केंद्रांवर एक लाख सात हजार महिलांनी लस घेतली होती. तर खासगी केंद्र मिळून एक लाख 27 हजार महिलांनी लस घेतली होती. सोमवारी महिलांना लस घेण्यास थेट प्रवेश देण्यात येणार आहे.