मुंबई : मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकल्यानं आता विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. राज्यपालांनी दिलेल्या डेडलाईन पाळू न शकल्यानं कुलगुरू संजय देशमुख यांनी स्वत: 15 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, 15 ऑगस्टच्या दिवशी फक्त दोनच विषयांचे निकाल लावण्यात आले. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच भवितव्य अंधारात सापडलं आहे.

अनेक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना तर पेपर तपासणीत भोपळा म्हणजेच शून्य मार्क मिळाल्यानं त्यांनी पुढे काय़ करायचा? हा प्रश्न आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष हे मुंबई विद्यापीठाच्या इतिहासातील काळं वर्ष असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

काल 15 ऑगस्टच्या दिवशी फक्त दोनच विषयांचे निकाल लागले असून अजून 144 विषयांचे निकाल बाकी आहेत. आतापर्यंत 1 लाख 63 हजार 245 उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे. तर काल एका दिवसात 245 शिक्षकांनी 6148 उत्तरपत्रिका तपासल्या आहेत. कालपर्यंत एकूण 333 विषयांचे निकाल लागले आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबई विद्यापीठाचा घोळ, पत्रकारितेच्या अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण

मुंबई विद्यापीठ पेपर तपासण्यासाठी सीएंची मदत घेणार

मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला