मुंबई : 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर मुंबई विद्यापीठाच्या एमएसी मायक्रोबायलॉजीची परीक्षा आता 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मुंबई विद्यापीठाने यासंदर्भात परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून सत्र सुरु झालेल्या एमएससी मायक्रोबायोलॉजीची परीक्षा आज म्हणजेच 23 जानेवारीपासून घेण्यात येणार होती. आश्चर्याची बाब म्हणजे या अभ्यासक्रमाची एकही तासिका झालेली नाही. त्यामुळे परीक्षा कशी द्यायची? असा प्रश्न विद्यापीठातील एमएससीचे विद्यार्थी विचारत होते.

एकही लेक्चर नाही, तरीही उद्यापासून परीक्षा, मुंबई विद्यापीठाचा कारभार

जवळपास दोन हजार विद्यार्थी एमएससी अभ्यासक्रमाची परीक्षा देत आहेत. मात्र, कॉलेजमध्ये तासिकाच न झाल्याने अभ्यासक्रमाबाबत कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जावं लागणार होतं.

मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र विद्यार्थ्यांनी कुलगुरु आणि परीक्षा विभागाला दिलं होतं. शिवाय याबाबत एबीपी माझानेही बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर विद्यापीठाने परिपत्रक काढून नवीन वेळापत्रक जारी केलं आहे.

दरम्यान, परीक्षेची वेळ आणि ठिकाण कायम राहिल असंही विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.