मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठातील विविध शाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुकीचे दोन्ही टप्पे मिळून एकूण 76 परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर 27 परीक्षांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.


22, 23 आणि 24 एप्रिल 2019 या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी तसेच 29 आणि 30 एप्रिल 2019 या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या 30, विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या 17, तर आंतरविद्या शाखेच्या 29 परीक्षा अशा एकूण 76 परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल.

विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या 4, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या 5, तर आंतरविद्या शाखेच्या 18 अशा एकूण 27 परीक्षांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. म्हणजेच या परीक्षा निवडणुकीपूर्वी सुरु होतील. यातील काही पेपर हे निवडणुकीच्या तारखेदरम्यान येत असल्याने तेवढ्याच पेपरचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे.

सुधारित वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (Hall Ticket) देखील दर्शवण्यात येईल.