मुंबई : "काय रे अलिबागवरुन आला आहेस का?", असं हिणवून अलिबागकरांचा विनाकारण अपमान का केला जातोय? असा सवाल करत सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काहीतरी ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.


अलिबागचे रहिवासी असलेल्या राजेंद्र मधूकर ठाकूर यांच्या वतीने अॅड. रघुराज देशपांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. हायकोर्टाने तूर्तास ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही नव्या सिनेमा, जाहिरात यांना प्रमाणपत्र जारी करताना अशा प्रकारचा उल्लेख काढून टाकण्याचे निर्देश देण्याची प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

सिनेमा, नाटक, टीव्हीवरच्या मालिका यातूनच प्रचलित झालेला, "काय रे अलिबागवरुन आला आहेस का?" हा डायलॉग म्हणजे, "तू मूर्ख आहेस का?" या आशयाचे उद्गार आहेत. त्यामुळे विनाकारण अलिबागसारख्या समृद्ध आणि महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या पर्यटनस्थळाची बदनामी होते, असं याचिकेत म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात त्यांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग वसवलं होतं. निसर्गरम्य समुद्र किनारे, सागरी किल्ले, देवस्थानं, अभयारण्य यांनी समृद्ध असलेला रायगड जिल्ह्यातील हा भाग मुंबई आणि पुणेकरांसाठीचं वीकएण्डसाठी सर्वात आवडतं ठिकाण आहे. त्याचबरोबर नव्यानं विकसित करण्यात आलेलं सरकारी आणि खाजगी उद्योगधंदे आणि प्रकल्प हे या ठिकाणाचं महत्त्व अधोरेखित करतात असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.