मुंबई : यूजीसीच्या सूचनांप्रमाणे केंद्रीय मंडळाच्या निकालानंतर मुंबई विद्यापीठाकडून पदवी प्रवेशाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 ऑगस्टपर्यंत सर्व पदवी महाविद्यालयांनी पदवी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून 10 ऑगस्टपासून कला , वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमांचे नियमित वर्ग सुरु करावेत, अशा सूचना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून मुंबई विभागातील सर्व संलग्न महाविद्यालयांना दिल्या आहेत.


राज्य मंडळाचा बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेश प्रथम वर्षाचे प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. जुलै मध्यात अंतिम प्रवेश फेरी सुद्धा पूर्ण झाली. मात्र इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने विशेष प्रवेश प्रक्रिया सुरू करून त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला. पदवी प्रवेशाच्या नियमित वर्गाना लेटमार्क लागल्यास पुढील शैक्षणिक वर्ष कोलमडण्याची शक्यता असल्याने मुंबई विद्यापीठाकडून वेळेत वर्ग सुरु करण्यासाठी या सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. पदवी प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच नियमित वर्ग सुरु होणार हा दिलासादायक निर्णय असला तरी अद्यापही प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांना घाई करावी लागणार असल्याने त्यांची तारांबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 सीबीएसई आणि आयसीएसई आणि इतर केंद्रीय मंडळाचे अनेक निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही त्यामुळे नामांकित कॉलेजच्या एकीकडे जागा पूर्ण भरल्याने आता त्या कॉलेजमध्ये आपला प्रवेश मिळणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये आहे. हा विचार करून काही नामांकित कॉलेजने आपली अंतिम यादी जाहीर केली नाही तर काही कॉलेजने जागा वाढवून घेण्याची तयारी दर्शवली आहे. तर काही स्वायत्त महाविद्यालयांनी या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवल्या आहेत


नक्की कोणत्या महाविद्यालयांत जागा उपलब्ध आहेत? किती आहेत त्याची चौकशी विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर करून त्याप्रमाणे महाविद्यालयांचा अर्ज भरावा लागत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व नोंदणीची लिंक ही सुरु ठेवण्यात आली असून ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ही नोंदणी केलेली नाही ते विद्यार्थी नोंदणी करून महाविद्यालयातील रिक्त जागांवर अर्ज सादर करू शकणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.