मुंबई : मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होणार आहेत. आज 12 ऑगस्ट 2021 पासून विद्यार्थ्यांना uom-admissions.mu.ac.in या संकेतस्थळावरून पदव्युत्तर अभ्यासक्रमांना अर्ज सादर करता येतील. विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रणाली तयार केली आहे.


विद्यापीठातील विविध विद्याशाखानिहाय राबवण्यात येणाऱ्या एकूण 48 पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील 12 अभ्यासक्रम, मानव्यविद्याशाखेतील 28 अभ्यासक्रम, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील 2 अभ्यासक्रम आणि आंतरविद्याशाखेतील 6 पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे .  


ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक 



  • ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया आणि  अर्ज सादर करणे – 12 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट, 2021 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

  • विभागाने ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी – 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2021 (सकाळी 10 वाजेपर्यंत )

  • तात्पूरती (प्रोव्हिजनल ) गुणवत्ता यादी जाहिर करणे – 30 ऑगस्ट, 2021 ( सायं. 6 वा.)

  • विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास - 31 ऑगस्ट, 2021

  • अंतिम गुणवत्ता यादी – 2 सप्टेंबर, 2021  ( सायं. 6 वा.)

  • ऑनलाईन शुल्क भरणे– 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर, 2021


पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठाने अतिशय सुलभ अशी ऑनलाईन प्रणाली तयार केली असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ट्यूटोरिअल आणि तांत्रिक अडचण उद्भवल्यास इमेल आयडीवर संपर्क करता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणे ते पेमेंट गेट-वेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार 15 सप्टेंबर 2021 पासून नियमित लेक्चर्सना सुरुवात होणार आहे.