मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये संशयित कोरोना बाधित असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळं झाल्याचं केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं  केईएम रुग्णालयातील या दोन रुग्णांचे रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळं झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

मुंबईतील केईएम रुग्णालयातील संशयित कोरोनाबाधित असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनानं दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाला असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते.तसे असले तरी त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  केईएम रुग्णालयात 58 वर्षीय महिलेचा आणि 13 वर्षीय मुलीचा  कोरोनाने मृत्यू झाला असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे.  किशोरी पेडणेकर यांनी केलेला दावा आणि केईएम रुग्णालयाकडून देण्यात येत असलेली माहिती यामध्ये विसंगती दिसून येत आहे. त्यामुळं या रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय असेल याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. 

भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 वर

भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी आहे. तर, 28 एप्रिलनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 58 इतकी आहे.  5 मेनंतर बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 42 इतकी आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या  12 इतकी आहे. 28 एप्रिलनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 7 इतकी नोंदवली गेली आहे. तर, 5 मेनंतर  करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 5 इतकी आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी मध्ये आहे. 

सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रुग्ण वाढले

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढली आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संंख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात 28 टक्क्यांनी वाढली आहे. तर, रुग्णसंख्या 14200 वर पोहोचली आहे. हाँगकाँमधील कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला नसला तरी तिथल्या कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

Covid-19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं संकट वाढलं, भारतात 58 नव्या रुग्णांची नोंद, तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला, नेमकं काय करायचं ते सांगितलं