मुंबई : मुंबईचे वाहतूक पोलीस बदलत्या काळानुसार हायटेक झाले आहेत. कारण अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबई वाहतूक शाखेनं वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तींवर ऑनलाईन पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यास सुरु केली आहे. विशेष म्हणजे, या नव्या प्रणालीमुळे मुंबई वाहतूक पोलीस हे देशातले पहिले कॅशलेस पोलीस ठरले आहेत.


जर एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर केला नसेल, किंवा आपलं वाहन वाहतूक सिग्नलवरच्या झेब्रा लाईनला क्रॉस केलं. तसेच एखाद्या चारचाकीतून वाहन चालकानं सीट बेल्टचा वापर केला नसेल, अशा व्यक्तींच्या चुका शहरातील कॅमेरांमध्ये कैद होतील. आणि त्याच्याकडून याचा दंड ऑनलाईन पद्धतीनं वसूल केला जाईल.



यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात तब्बल पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीनं वाहतुकीचे नियम तोडल्यास, तो घरी पोहचण्याअधीच दंडाची पावती त्याच्या घरी पोहोचली असेल. ही पावती मिळाल्यानंतर त्याचं पेमेंटही त्याला ऑनलाईन करावं लागेल. यासाठी तो ई-वॉलेट, ई-कॉमर्स किंवा वोडाफोन स्टोअरच्या माध्यमांचा वापर करु शकतो.



वाहतूक शाखेनं या नव्या ऑनलाईन दंडवसुलीच्या प्रणालीसाठी हायटेक ट्रॉफिक कंट्रोल रुमही सुरु केली आहे. इथे वाहतूक शाखेचे पोलीस आणि आयटी तज्ज्ञ नियम तोडणाऱ्याच्या चुकांवर लक्ष ठेवतील. याशिवाय शहराच्या अनेक भागात अल्कोबूथही स्थापन करण्यात आले आहेत.

तसेच अल्ट्रा मॉडर्न हायड्रोलिक टोईंग व्हॅन, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कॉण्ट्रा फ्लो लेन आणि ट्रॅफिक वार्डनचा वापर केला जाईल. या सर्व सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मुंबई पोलीस हायटेक झाले आहेत.

विशेष म्हणजे, मुंबईकरांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोलिसांनी 'मुंबई ट्रॅफिक पोलीस (MTP)' नावाचं नवं अॅपही विकसीत केलं आहे. यामाध्यमातून मुंबईकरांना वाहतुकीच्या संबंधित सर्व माहिती आणि तक्रारी दाखल करता येतील.