मुंबई : मुंबईतील दिंडोशी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा डम्परच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी या घटनेत जखमी झाले आहेत. यानंतर डम्परचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पांडुरंग मारुती सकपाळ (वय 40 वर्ष) असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर भावेश पितळे (वय 32 वर्ष) हे या अपघातात जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


मारुती सकपाळ आणि वॉर्डन भावेश पितळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गोरेगावातील हब मॉलवरुन ड्युटी करुन दुचाकीवरुन परत येत होते. त्यावेळी दुपारी अडीचच्या सुमारास अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या डम्परने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.


नियंत्रण सुटल्याने मारुती सकपाळ डम्परच्या खाली आले आणि त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. तर भावेश पितळे हे देखील जखमी झाले. मारुती आणि भावेश यांना अंधेरी पूर्वेतील होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे दाखल व्हायच्या आधीच मारुती यांनी प्राण सोडले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर त्यांचे सहकारी भावेश पितळे यांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला.



ही घटना घडल्यावर डम्पर चालक मुन्नाकुमार चौहान डम्पर सोडून, या दोघाना मदत न करता पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कलम 304 (अ) आणि 134 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करुन डम्पर ताब्यात घेतला. परंतु धडकेनंतर डम्परच्या चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलिसांनी रात्री डम्पर चालक मुन्नाकुमार चौहान याला अटक केली.


याआधी मारुती पांडुरंग सकपाळ कांदिवलीतील चारकोप पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी त्यांची बदली दिंडोशी वाहतूक विभागात झाली होती. पांडुरंग सकपाळ हे दिंडोशी वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असल्याने वरिष्ठांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त केलं आहे.