चलन तुटवड्यावर मार्ग काढा, व्यापाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2016 11:29 PM (IST)
मुंबई : काळ्या पैशाला आमचा विरोधच आहे, मात्र चलन तुटवड्यावर काही तरी मार्ग काढावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नोटबंदीमुळे मंदीची झळ सोसाव्या लागणाऱ्या व्यापऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने 'वर्षा'वर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांच्यासोबत काही व्यापारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान यापूर्वी देखील व्यापारी संघटनांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. नोटाबंदीमुळे व्यवहार मंदावल्याची कैफियत व्यापाऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली होती. बाजारात चलन तुटवडा असल्याने जवळपास 70 टक्के व्यापार थंडावला असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. यावर मार्ग काढण्यासाठीच आज व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.