डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मार्डमध्ये तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे.
चार दिवसांपूर्वी जेजे रुग्णालयातील महिला डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केलं होतं. मात्र डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे मोठे हाल होताना दिसले.
'जेजे'च्या डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही कायम, रुग्णांचे हाल
जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत संपाच्या भूमिकेवर जेजे रुग्णालयाचे निवासी डॉक्टर ठाम होते. सरकारने लिखित आश्वासन देऊन मागण्यांसंदर्भात वर्क ऑर्डर काढली, तरच हा संप मागे घेऊ असं संपकरी डॉक्टरांचं म्हणणं होतं.
अशा परिस्थितीमध्ये एखाद्या रुग्णाचं बरंवाईट झालं तर त्याला सरकारच त्याला जबाबदार असेल, असंही संपकरी निवासी डॉक्टरांनी म्हटलं होतं.
काय आहे प्रकरण?
जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 11 या सर्जरी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. या मारहाणीचा व्हिडीओ ही समोर आला आहे.
या प्रकरणी मुंबईच्या जे.जे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 353 आणि 332 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेडिकेअर कायद्यासोबतच आरोपींवर तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरुच
जे जे हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण