मुंबई : मुंबईत एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील कामासाठी विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. तर दुसरीकडे दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य मार्गावरील ठाणे ते कल्याण (धिम्या मार्गावर) आणि हार्बर मार्गावरील चुन्नाभट्टी-सीएसएमटी-वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
एल्फिन्स्टन रोड स्थानकावर पादचारी पुलाच्या गर्डरसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. 4 आणि 5 मार्च दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येईल. आज, म्हणजे रविवारी रात्री साडेनऊ ते सोमवारी पहाटे सहा वाजेपर्यंत हा ब्लॉक चालेल.
या विशेष ब्लॉकमुळे चर्चगेट-मुंबई सेंट्रल ते माहिम स्थानकादरम्यान धावणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल महालक्ष्मी, एल्फिन्स्टन रोड आणि माटुंगा या स्थानकांवर थांबणार नाहीत. तर लोअर परळ आणि माहिम स्थानकांवर लोकल फेऱ्यांना दुहेरी थांबा देण्यात येणार आहे.
या विशेष मेगाब्लॉकमुळे वांद्रे ते चर्चगेट स्थानकादरम्यानच्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.
दुसरीकडे मध्य आणि हार्बर मार्गावरही दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावरील ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर सकाळी 11 ते 4 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मुलुंड ते कल्याण स्थानकादरम्यानच्या सर्व धिम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्य मार्गावरील सर्व लोकल 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
याशिवाय, हार्बर मार्गावरील चुन्नाभट्टी-वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सदरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सहुन पनवेल, बेलापूर आणि वाशी स्थानकासाठी सुटणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सीएसएमटीवरुन अंधेरी आणि वांद्र्याकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्याही या मेगाब्लॉक काळात बंद असणार आहेत.
दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी कुर्ला स्थानकातून पनवेल, वाशी आणि बेलापूरसाठी विशेष लोकल सोडण्यात येतील.
प. रे.वर विशेष रात्रकालीन ब्लॉक, तर हार्बर आणि मध्यवरही मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2018 07:49 AM (IST)
एल्फिन्स्टन रोड स्थानकावर पादचारी पुलाच्या गर्डरसाठी विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -