मुंबई : मुंबईतील वाकोला परिसरात पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी मुलावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. पैशावरुन झालेल्या वादानंतर मुलगा सिद्धांतनेच जन्मदात्रीचा जीव घेतल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.


हत्येची घटना उघडकीस आल्यापासून सिद्धांत बेपत्ता आहे आणि घरातील दोन लाखांची रक्कमही गायब आहे. दीपाली गणोरे यांच्या मृतदेहाशेजारी रक्तानं "टायर्ड ऑफ हर, कॅच मी अँड हँग मी" (तिला कंटाळलो आहे. मला पकडा आणि फासावर लटकवा) असंही लिहून पुढे स्माईली काढण्यात आला आहे.

खार पोलिस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दीपाली गणोरे यांची मंगळवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास हत्या झाली होती. रात्री 11 वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर गणोरे सांताक्रुझच्या प्रभात कॉलनीतील घरी आल्यावर कोणीच दरवाजा उघडला नाही. त्यांनी 12-12.30 पर्यंत वाट पाहिली आणि मग शोधाशोध सुरु केली.

शेजाऱ्याच्या मदतीनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. शोधाशोध करताना ज्ञानेश्वर गणोरेंना चावी घराच्या कचऱ्याच्या पेटीत सापडली. त्या चावीनं दरवाजा उघङल्यावर दीपाली यांचा मृतदेह समोर आला.

ज्ञानेश्वर गणोरे यांचा मुलगा सिद्धांत हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आहेत. सिद्धांत आणि त्याची आई
दीपाली यांच्यात पैशामुळे वाद झाला असावा, त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिद्धांतनं आपल्या आईला घरात दोन लाख रुपये ठेवताना पाहिलं होतं. त्यामुळे त्याने आईकडे पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास आईने नकार दिल्यामुळे चिडलेल्या सिद्धांतने सख्ख्या आईचाच जीव घेतला असावा, असा संशय आहे.

कूपर हॉस्पिटलमध्ये दीपाली यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. त्यानंतर पार्थिव नाशिकला नेण्यात आलं आहे. मुलगा सिद्धांत गणोरे अद्याप फरार आहे.