मुंबई : आईकडे पाठ फिरवून परदेशात स्थायिक झालेल्या मुलाला मुंबईत परतल्यानंतर आईचा सांगाडा आढळला आहे. अंधेरी भागातल्या ओशिवरासारख्या उच्चभ्रू परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.


ऋतुराज साहनी हे आयटी इंजिनिअर आहेत. नोकरीनिमित्त ते पत्नी आणि मुलासह अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. अंधेरीतल्या ओशिवारा भागातील बेल स्कॉट टॉवरच्या दहाव्या मजल्यावर साहनी कुटुंबाचा फ्लॅट आहे. घरात ऋतुराज यांच्या 63 वर्षीय मातोश्री आशा केदार साहनी एकट्याच राहायच्या.

आपल्या आईला भेटण्यासाठी रविवारी ऋतुराज मुंबईत आले. बराच वेळ आईने दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दिसलेलं दृश्य भयावह होतं. आशा साहनी यांचा मृतदेह बेडवर कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना बोलावल्यानंतर आशा यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.

फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे आशा यांनी आत्महत्या केली, किंवा त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या घरात कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे.

ऋतुराज यांनी आईचा सांभाळ करण्यासाठी कुठलाही केअर टेकर किंवा घरकामाला नोकर-चाकर ठेवला नव्हता. त्यामुळे आशा यांनाच सगळी कामं करावी लागत.

धक्कादायक म्हणजे ऋतुराज आणि आशा यांच्यातील अखेरचं बोलणं मे 2016 मध्ये म्हणजे तब्बल सव्वा वर्षांपूर्वी झालं होतं. सोसायटीच्य वॉचमनने दिलेल्या माहितीनुसार ऋतुराज गेल्या काही वर्षांत कधी मुंबईत फिरकले नाहीत. आशा साहनीही फारशा घराबाहेर पडत नसत.

आशा यांचा मृत्यू नेमका कधी झाला, त्यांचा मृतदेह कुजला असताना इतर रहिवाशांना दुर्गंधी कशी आली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आईला एकटं सोडून लाखो कमावणाऱ्यांवर गुन्हा का दाखल करु नये असा सवाल विचारला जात आहे.