मोपलवारांना पदच्युत केल्यानंतर भूषण गगराणींना अतिरिक्त कार्यभार
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2017 04:21 PM (IST)
विमानतळासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया भूषण गगराणी उत्तमप्रकारे जाणतात. त्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी त्यांच्या पदरात पडल्याची शक्यता आहे.
मुंबई : राधेश्याम मोपलवार यांना पदच्युत केल्यानंतर भूषण गगराणी यांच्याकडे एमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. गगराणी हे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मोपलवार यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्ववभूमीवर अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या भूषण गगराणी यांची निवड करण्यात आली आहे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राहून नवी मुंबई विमानतळाचं काम मार्गी लावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. विमानतळासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया गगराणी उत्तमप्रकारे जाणतात. त्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी त्यांच्या पदरात पडल्याची शक्यता आहे.