Mumbai Court News : टेनिसपटू लिएंडर पेसला त्याच्या कौंटुबिक हिंसाचार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं काहीसा दिला आहे. पेसची लिव्ह-इन पार्टनर आणि त्यांच्या मुलीची आई रिया पिल्लईला दरमहा 1 लाख रुपये देण्याच्या दंडाधिकारी कोर्टाच्या निर्देशाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं पेसच्या याचिकेवरील सुनावणी 17 डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहे. रियानं पेसविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली तेव्हा त्यांच्यात कोणतेही संबंध नव्हते असा पेसनं आपल्या याचिकेतून दावा केला आहे.
पेसनं रियाकडून झालेल्या आरोपांनुसार कौटुंबिक हिंसाचाराची विविध कृत्ये केल्याचं मान्य केल्यामुळे दंडाधिकारी न्यायालयाने त्याला दरमहा 1 लाख रुपये घरभाडं आणि या व्यतिरिक्त रियाने वांद्रे (पश्चिम) येथील कार्टर रोडची सदनिका दोन महिन्यांत सोडावी या अटीवर तिला दरमहा 50 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले होते. मात्र पेसनं हे आदेश रद्द करण्याची मागणी करत मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
#काय आहे प्रकरण -
आपल्या याचिकेत पेसनं रियासोबतचे आपले नाते ‘लग्नाच्या स्वरूपाचे’ असल्याचं साफ नाकारलेलं आहे. रियाशी त्याची साल 2005 मध्ये भेट झाली आणि त्यांना साल 2006 मध्ये मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर त्यांचं नातं तुटलं आणि बाळासाठी ते सौहार्दपूर्ण एकत्र राहिले. रियानं अभिनेता संजय दत्तशीही लग्न केलं होतं. संजय दत्तसोबत आणि घटस्फोट झाल्यानंतर पोटगी म्हणून तिला 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वांद्रे (पश्चिम) इथं दोन सी फेसिंग सदनिका मिळाल्या होत्या. मात्र, तिरीही रियानं आपल्याच अपार्टमेंटमध्ये राहणं पसंत केलं, त्यामुळे आपल्यावर विनाकारण आर्थिक बोजा पडला असून मासिक वीज देयकही सुमारे 60 रुपयांपर्यंत गेल्याचा आरोप पेसनं या याचिकेतून केला आहे. विभक्त झाल्यानंतरही आपण आपल्या मुलीची आर्थिक जबाबदारी नेहमीच उचलली असून रियानं केवळ स्वत:वरच उधळपट्टी केल्याचा आरोपही पेसनं केला आहे. सध्या आपलं स्वतःचं घर गहाण असून रियानं त्यांच्या मुलीच्या नावाखाली केलेल्या आर्थिक मागण्या पुरविण्यास आपण असमर्थ असल्याचं त्यानं याचिकेत स्पष्ट केलं आहे. तसेच, न्यायालयाचे आदेश असूनही, रियानं त्यांच्या मुलीला आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी किंवा पद्मभूषण सारख्या सन्मान सोहळ्यात आपल्यासोबत जाऊ नये यासाठी परावृत्त केल्याचा दावाही पेसनं याचिकेतून केला आहे.
#कौटुंबिक कोर्टातील प्रकरण:
रिया पिल्लईनं साल 2014 मध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत दिलासा मिळावा यासाठी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. साल 2008 मध्ये, त्या कार्टर रोड येथील त्यांच्या सध्याच्या घरी पेससोबत 'लिव्ह इन रिलेशनमध्ये' राहायला आल्या. यादरम्यान पेसचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, असा आरोपही तिनं केला. त्यांनी खूप त्रास सहन करून घर सजवण्यासाठी मोठा खर्च केला आणि नातेसंबंध पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेस साल 2008 मध्ये दुरावल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रियाच्या द्याव्यानुसार, पेसनं भावनिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांच्या नातेसंबंधाच्या प्रत्येक टप्प्यावर तिची फसवणूक आणि विश्वासघातच केला. त्याची कृत्ये आणि आचरणातून त्यानं मौखिक, भावनिक आणि आर्थिक गैरवर्तनही केले, ज्यामुळे आपल्यावर प्रचंड भावनिक हिंसाचार आणि आघात झाल्याचा आरोप रियानं याचिकेतून केला होता. रियाकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करण्याऐवजी पेसनं त्याच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपाचे समर्थन करत त्याच्या दृष्टिकोनातून बाजू मांडायचा प्रयत्न कोर्टात केला होता. मात्र न्यायालयानं रियाच्या बाजूने निकाल देत पेसला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता.