मुंबई : सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवही रद्द करण्यात आले. आषाढी वारीही कोरोनाच्या सावटातच पार पडली, तर दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय अनेक मंडळांनीही घेतला आहे. अशातच यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे.
यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचेच सावट आहे. साधेपणानं गणेशोत्सव साजरा व्हावा ही गणेश मंडळांची देखील अपेक्षा होतीच. मात्र, आता मुंबई महापालिकेच्या नियमावलीमुळे गणेशोत्ससवावर बरेच निर्बंध आले आहेत. श्रींच्या मूर्तीची उंची कमी होणार आहेच, पण त्याचबरोबर मंडळांना अनेक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाहीच, पण हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन कार्यक्रमांना केवळ 10 कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहावे लागणार आहे.
पाहा व्हिडीओ : मुंबईत बाप्पांची उंची, कार्यकर्त्यांची संख्या किती असावी?, गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जाहीर
मंडळांना गेल्या वर्षीच्या परवानगीच्या आधारेच मोफत परवानगी
मुंबईत साधारणत: साडेबारा हजार गणेशोत्सव मंडळं आहेत. दरवर्षी गणपती मंडळांना पालिका, पोलीस यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. पालिकेने यावर्षी गणपती मंडळांना गेल्या वर्षीच्या परवानगीच्या आधारेच मोफत परवानगीचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याकरिता सर्व मंडळांना लेखी हमीपत्र द्यावे लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग किंवा फैलाव होऊ नये या दृष्टीने हमीपत्रात पालिकेने अनेक अटी घातल्या आहेत.
नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई
गणेश मंडळांना एकूण 19 अटींचे पालन करावे लागणार आहे. या अटींचे पालन न केल्यास मंडळांवर साथरोग कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव मंडळांसाठी हमीपत्रातील अटी व नियम :
- गणेशमूर्ती 4 फुटांपेक्षा जास्त उंचीची नको.
- मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत. मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक.
- सोशल डिस्टंसींगचं पालन करणं बंधनकारक
- मंडपाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देणे.
- बाप्पाला प्रसाद, हार, फुलं अर्पण करता येणार नाहीत.
- मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत.
- आरतीला मंडपात जास्तीत जास्त दहा कार्यकर्त्यांना प्रवेश. आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. केवळ दहा कार्यकर्त्यांची उपस्थिती बंधनकारक.
- मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावे.
- भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी लागणार
- व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध.
- भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
- कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे.
- ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून करोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे