Mumbai School Reopen : कोरोना महामारीचा प्रादुर्भावामुळे कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 14 जिल्हे वगळता सोमवारपासून राज्यातील शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट झाला होता. मुंबईसह ठाणे, जळगाव, नाशिक, नंदुरबारमध्ये पहिली ते बारावीचे वर्ग भरले होते. तर धुळ्यात नववी ते बारावी, बीडमध्ये अकरावी ते बारावी, जालन्यात आठवी ते बारावी, नांदेडमध्ये नववी ते बारावीचे असे टप्प्याटप्प्यानं वर्ग सुरू होतील. मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नव्हती. मुंबईत पहिल्याच दिवशी शाळेंमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.


मुंबईतील शाळा 24 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पालिका शिक्षण विभागाकडून शहरातील सर्व माध्यम, व्यवस्थापन, मंडळाच्या शाळांना तशा सूचनाही दिल्या. त्याप्रमाणे मुंबईतील 90  टक्क्यांहून अधिक शाळांनी वर्ग सुरु करून प्रतिसादही दिला आहे. शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती सुद्धा 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे. शाळांमध्ये मुलांनी 60 टक्‍क्‍यांच्या जवळपास हजेरी लावली आहे. शाळांमध्ये शिक्षकांची एकूण उपस्थिती ही जवळपास 90  टक्के तर पालिका शाळांमधील  शिक्षकांची उपस्थिती ही जवळपास 97  टक्के होती. 


मुंबईतील एकूण शाळांची संख्या एक हजार 774 इतकी आहे. सोमवारपासून, म्हणजेच 24 जानेवारी पासून एक हजार 731 शाळा सुरु झाल्या आहेत. मुंबईतील एकूण विद्यार्थी संख्या 982860  इतकी आहे. यामधील 526452 विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेत उपस्थिती दर्शवली आहे. मुंबईतील शाळेतील एकूण शिक्षकांची संख्या  34486 इतकी आहे.  यामधील 31353 इतक्या शिक्षकांनी शाळेत उपस्थिती दर्शवली आहे. 


दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात राज्यातील शाळा सातशे दिवस बंद होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.  ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना रिस्क वाटतेय, त्यांनी आपल्या पालकांना शाळेत पाठवू नये.