मुंबई : तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा आता 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील महानगरपालिका शाळा, खाजगी व्यवस्थापन, इतर सर्व मंडळाच्या शाळांना आठवी ते बारावी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून आयुक्तांपुढे मांडण्यात आला होता. त्याला बीएमसी आयुक्त इकबाल सिंग चहल यांची  मंजुरी मिळाली आहे. मुंबई परिक्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या एकूण शाळा 2553 आहेत व त्यात एकूण विद्यार्थी 5, 13, 502 विद्यार्थी शिक्षण घेतात.



शिक्षण विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचा पालन करत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्याआधी शाळांनी योग्य ती खबरदारी घेऊन आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे असे निर्देश पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. याशिवाय शाळा सुरु करण्याआधी व केल्यानंतर आरोग्य , स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांची योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनांना करण्यात आल्या आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडिअम हायपोक्लोराइड सोल्युशनने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी आपल्या स्तरावर निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना पालिका शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ज्या शाळा आतापर्यंत कोविड 19 चे केंद्र , विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र म्हणून वापरात आहेत, त्यांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करून शाळा वारण्यायोग्य स्थितीत आणाव्यात अशा सूचना ही शहरातील शाळा व्यवस्थापन आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. 


MPSC Result : महाराष्ट्र वन सेवेचा निकाल जाहीर, मुलांमध्ये नगरचा वैभव दिघे तर मुलींमध्ये पुण्याच्या पुजा पानसरेची बाजी


कोविड सेंटर, रेल्वे स्थानकात लसीकरण केंद्रात, प्रमाणपत्रे पडताळणी, तसेच निवडणूक कामांसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांनाही कार्यमुक्त करावे असे निर्देश तडवी यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी जवळच्या महानगरपालिकेच्या किंवा खाजगी आरोग्य केंद्राशी शाळा संलग्न करण्याच्या सूचना ही शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करताना शाळेमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे शिवाय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेणे सुद्धा गरजेचे आहे.  पालकांची संमती असल्यानंतरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतो, अन्यथा पालकांची संमती नसल्यास त्या पालकांच्या पाल्याचे ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवण्यात येईल. 4 ऑक्टोबर पासून इयत्ता आठवी ते बारावी शाळा तरी सुरू होत असल्या तरी पुढील कोरोनाची मुंबईतील स्थिती पाहता नोव्हेंबर महिन्यात इतर वर्गाच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निर्णय घेण्यात येणार आहे