मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं महिलेने म्हटलं आहे.


काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. संबंधित महिलेने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आपले करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत संबंध होते आणि या संबंधातून दोन मुले असल्याचा खुलासा त्यांनी केला होता.


या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही याची गांभीर्याने दखल घेतली होती. परंतु पोलिसांच्या तपासात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध काही सिद्ध झालं तरच पक्ष योग्य तो निर्णय घेईल. तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं.


आता संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने गुन्हा दाखल करु नये अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान बलात्काराची तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार 


मनसे, भाजपच्या नेत्यासह जेट एअरवेजच्या अधिकाऱ्याचा रेणू शर्मावर आरोप
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या या महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. तर मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्याने देखील महिलेवर असाच आरोप केला आहे.


खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करा : चित्रा वाघ
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. परंतु आता संबंधित महिलेने त्यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपने खोटे आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अशाप्रकारामुळे ज्या महिला खरंच पीडित महिला आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. सरकारी यंत्रणाचा बराच वेळ या प्रकरणात गेला. अशा प्रकारच्या आरोपांमुळे एखाद्याचं वैयक्तिक आयुष्यासह राजकीय जीनवही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.


हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही : सुप्रिया सुळे
धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाची सविस्तर चौकशी करावी अशी आमची आधीपासून मागणी होती. हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे अत्यंत वाईट आहे. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आपण बोलत नसतो. पण भाजपकडून यात राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.


संबंधित बातम्या


कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील


बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडेंचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार