Mumbai rains update : सकाळपासून मुंबईत तुफान पाऊस सुरु आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यामळं वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबई पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मरिन लाईन लोकल स्थानकाच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे मोठे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. विद्युत वाहिनीवर झाड आल्यानं त्याला देखील आग लागल्याची घटना घडली आहे.
मुंबईत सकाळी 9 ते 10 दरम्यान ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. मुंबई महापालिकेच्या काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर एका तासात 80 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दक्षिण मुंबईतील एका स्टेशनवर 104 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, आयएमडीनं सकाळी 9 ते 10 दरम्यान झालेला पाऊस हा ढगफुटी नसल्याचं सांगितलं आहे. आयएमडीकडून दक्षिण मुंबईतील त्या एका तासातील पाऊस हा अतिमुसळधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही रमंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.