Maharashtra Mumbai Rain Update : पुढील काही तासात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात मान्सूनने दमदार एन्ट्री केली. परंतु पहिल्याच पावसात मुंबईसह उपनगरात दाणादाण उडाली. अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान मुंबईसह, कोकण, पुणे आणि विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jun 2021 06:57 AM
मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात; सायन, गांधी मार्केट परिसरातील रस्ते जलमय

मुंबई मध्यरात्रीपासूनच पावसाची कोसळधार सुरु आहे. अशातच मुंबईतील परळ, दादर आणि सायन परिसरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसत आहेत. सायन परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन भागातील गांधी मार्केट येथे मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे. 

मुंबईसह पश्चिम उपनगरात पावसाला सुरुवात, पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

मुंबईसह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे, मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे तिथे दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

पुढील काही तासात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता

पुढील काही तासात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातही पावसाची हजेरी. लातूर, बीड, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता. पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मुंबईला आज ऑरेंज अलर्ट, विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन

पहिल्याच पावसात खोळंबलेली मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केलं आहे.

लोणावळ्यात मोसमातील पहिल्याच पावसाची दमदार हजेरी

थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या पुण्यातील लोणावळ्यात मोसमातील पहिल्याच पावसाची दमदार हजेरी. चोवीस तासात इथं सत्तर मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. चालू वर्षीचा पाऊस धरून आत्तापर्यंत 240 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 219 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पावसाने असाच जोर कायम ठेवला तर पर्यटकांना खुनावणारा भुशी धरण लवकरच भरू शकेल.

मुंबई शहरात पावसाची सकाळपासून पुन्हा हजेरी

रात्रभर काहीशी विश्रांती घेतल्यानंतर मुंबई शहरात सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. भायखळा, लालबाग, काळाचौकी परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.

पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरण, पावसाचा जोर ओसरला

पालघर जिल्ह्यात बुधवारी (9 जून) पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दुपारनंतर विश्रांती घेतली असून आज वातावरण ढगाळ असलं तरीही पावसाचा जोर ओसरलेला आहे.

मुंबई शहर व उपनगरामध्ये पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस पडणार

मुंबई शहर व उपनगरामध्ये पुढील 3 ते 4 तासांत तीव्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीच्या शक्यतेने दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस सर्व दुकाने बंद राहणार..  वैद्यकीय  सेवेतील रुग्णालये, मेडिकल, पॅथेलॉजी सुरू राहणार... 10 आणि 11 जून दरम्यान इतर दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश... रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याच्या शक्यतेने दुकाने बंद ठेवण्याचे आदेश...

बुलडाणा : अचानक पडलेल्या पावसामुळे खडकपुर्णा नदीपात्रात 20 वाहनं अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

 


लोणार तालुक्यातील भुमराळा येथे वाळूचा लिलाव झालेला असुन अनेक ठिकाणांहून वाळू नेण्यासाठी वाहने भुमराळा वाळू घाटांवर येत असतात. मात्र अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस आल्याने खडकपुर्णा लगत असलेल्या ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पूराचे पाणी खडकपुर्णा नदीपात्रात घुसले. काही कळण्याच्या आतच संपूर्ण वाहने पाण्यात बुडाल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहन चालक पुराच्या पाण्यातून पोहत पूर्णा नदीच्या काठावर येऊन थांबले, त्यामुळे जीवितहानी झाली नाही.  वाहने काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे

स्लो लाइन सीएसएमटी/कल्याण आणि सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत

स्लो लाइन सीएसएमटी/कल्याण आणि सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत. तर हार्बर मार्गावरील वडाळा-मानखुर्द विषयी लवकरच अपडेट दिली जाईल : रेल्वे

आज 24 तासात मुंबई शहरात 77.4 मिमी पाऊस पडला तर उपनगरात एकूण 59.6 मिलिमीटर पावसाची नोंद

आज 24 तासात मुंबई शहरात 77.4 मिमी पाऊस पडला तर उपनगरात एकूण 59.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 1 जून 2021 पासून ते आतापर्यंत मुंबई शहरात 137.8 मिलिमीटर पाऊस पडला तर उपनगरात 196.6 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय.

परभणी शहरासह जिल्हाभरात मुसळधार पावसाने हजेरी

परभणी शहरासह जिल्हाभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस बरसतोय. पहिल्याच पावसात परभणी शहराची मात्र दाणादाण उडालीय. तब्बल 1 तासापेक्षा जास्त वेळेपासून पाऊस सुरू असल्याने छोटे मोठे नाले ओसंडून वाहत आहेत. तर याच नाल्यांचे पाणी हे शहरातील रस्त्यासह मोठ्या प्रमाणावर साचल्याने याच पाण्यातुन नागरिकांना मार्ग काढावा लागलाय. 

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद परिसरात जोरदार पाऊस

यवतमाळ : जिल्ह्याच्या पुसद परिसरात जोरदार पाऊस झाल्याने छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. .पहिल्याच पावसाची दमदार हजेरी. पुसद तालुक्यातील भोजला शेलु खुर्द  पिंपळगाव परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस.

नाशिक जिल्ह्यातील काही भागात दुपारच्या सुमारास पावसाची हजेरी

नाशिक जिल्ह्यातील काही भागात दुपारच्या सुमारास पावसाची हजेरी, येवला तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये आज मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले, अंगुलगाव,देवदरी या परिसरातील नदीला पूर आल्याने पहिल्याच पावसात छोटे बंधारे भरून वाहू लागले

नाशिक जिल्ह्यातील काही भागात दुपारच्या सुमारास पावसाची हजेरी

नाशिक जिल्ह्यातील काही भागात दुपारच्या सुमारास पावसाची हजेरी, येवला तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये आज मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले, अंगुलगाव,देवदरी या परिसरातील नदीला पूर आल्याने पहिल्याच पावसात छोटे बंधारे भरून वाहू लागले

ठाणे आणि एमएमआरडीए परिसरात पावसामुळे लोकल ट्रेनचा आणि वाहतुकीचा खोळंबा

ठाणे आणि एमएमआरडीए परिसरात पावसामुळे लोकल ट्रेनचा आणि वाहतुकीचा खोळंबा 

रत्नागिरी जिल्ह्याला पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी गाडीतूनच केली मुंबईची पहाणी

मुख्यमंत्र्यांनी गाडीतूनच केली मुंबईची पहाणी. दादर टीटी आणि हिंदमाता येथे पहाणीसाठी न थांबता मुख्यमंत्री सरळ मुंबई महापालिकेच्या डिझास्टर कंट्रोल रुममध्ये आले. डिझास्टर कंट्रोल रुममधून मुख्यमंत्र्यांनी पाचच मिनीटांत संपूर्ण मुंबईचा आढावा घतला. आणि माध्यमांशी न बोलता मुंबई महापालिका मुख्यालयातून बाहेर पडले.

आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदमाता परीसरातील आढावा घेण्यासाठी पोहचले

आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदमाता परीसरातील आढावा घेण्यासाठी पोहचले. सकाळपासूनच मुंबईच्या बर्‍याच भागात पाऊस पडत आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील 2 ते 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon update | मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील 2 ते 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस.

मुंबई, कोकणासह पुण्यात येत्या दोन ते तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी सब-वे चार महिने बंद राहणार

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी सब-वे पावसाळ्याच्या चार महिन्यात बंद राहणार अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. 

धुळ्यात अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात घडली आहे. ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडाट सुरु असताना शेतातील झाडाच्या खाली पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर अचानक वीज कोसळली. गोपीचंद सुकलाल सनेर (वय 55 वर्ष) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

मुंबई आणि परिसरातील पावसाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, पाण्याचा निचरा तातडीने होईल वाहतूक सुरळीत होईल, असे पाहण्याचे यंत्रणांना निर्देश

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर  जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस  मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली. मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत आणि जिथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरु राहिल हे पाहण्यास सांगितलं. कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबईत पम्पिंग स्टेशन्स कार्यरत राहतील आणि साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे. तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस आणि इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर गुडघ्यापर्यंत पाणी साचलं

ठाण्यातील सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. गेले एक ते दोन तास सलग पाऊस पडल्याने ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुडघ्यापर्यंत पाणी साचलेले बघायला मिळत आहे. याच पाण्यातून वाट काढत रहिवाशांना आणि वाहनचालकांना जावे लागत आहेत. पाऊस असाच सुरु राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. 

मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीही केला नव्हता : महापौर

मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीही केला नव्हता. पाणी भरल्यानंतर चार तासांनंतर निचरा झाला नाही तर दाव्याची पोलखोल हा आरोप योग्य आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसंच विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा 

कुर्ला ते सायन रेल्वे स्थानकादररम्यान पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला .कल्याण रेल्वे स्थानकाहुन ठाणे रेल्वे स्थानाकापर्यंत रेल्वे वाहतूक सुरू होती .त्यामुळे कल्याण  रेल्वे स्थानकावर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मात्र खोळंबा झाला होता .कल्याण रेल्वे स्थानकावर दोन तास कर्मचारी रेल्वेच्या प्रतीक्षेत होते .प्रत्येक पावसाळ्यात उदभवणारी ही समस्या रेल्वे ने निकाली काढावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जातेय

पालघरमध्ये अतिवृष्टीची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली असून अजूनही  पावसाची हजेरी कायम आहे . पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली  आहे. तर ग्रामीण भागातील नदी नाले ओसंडून वाहताना दिसत आहेत . 9 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्र आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे

भिवंडीत मुसळधार पावसाला सुरुवात, रस्त्यांवर पाणी साचलं

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे पुढील तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याची आशंका व्यक्त करण्यात आली आहे. आज भिवंडीत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने शहरातील कल्याण नाका तीन पत्ती भाजी मार्केट मुंबई पाडा इत्यादी परिसरात पाणी साचले आहे तर ते कल्याण नाका परिसरात रस्त्यावर तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. भिवंडी महानगरपालिकाने केलेली नालेसफाई अक्षरशःफोल ठरली आहे

भिवंडी महानगरपालिकेचा नालेसफाईचा दावा फोल? अनेक भागांत पाणी साचलं

भिवंडी : हवामान खात्याने दर्शवल्या प्रमाणे पुढील तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याची आशंका व्यक्त करण्यात आली आहे, असे असताना आज भिवंडीत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने शहरातील कल्याण नाका तीन पत्ती भाजी मार्केट मुंबई पाडा इत्यादी परिसरात पाणी साचले आहे तर ते कल्याण नाका परिसरात रस्त्यावर तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. भिवंडी महानगरपालिकेने केलेली नालेसफाई अक्षरशः फोल ठरली आहे. 

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी, सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात

पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून अजूनही  पावसाची हजेरी कायम आहे.  पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु असून अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली  आहे . तर ग्रामीण भागातील नदी नाले ओसंडून वाहताना दिसत आहेत . 9 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्र आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे . तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी .

महाराष्ट्रभरात पावसाची हजेरी; कुठे संततधार, कुठे मुसळधार कोसळल्या सरी

महाराष्ट्रभरात पावसानं हजेरी लावली आहे. कुठे संततधार, तर कुठे मुसळधार सरी कोसळताना पाहायला मिळाल्या. मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून म्हणजेच, 9 जून ते 13 जून दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी

मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी. दादर, मानखुर्द, सायन परिसरात जोरदार पाऊस 

पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत

पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत, मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद 

पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत

पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत, कामावर निघालेल्या चाकरमाऱ्यांच्या वाटेत अडथळे 

पहिल्याच पावसात मुंबईच्या रेल्वे ट्रॅकवरही पाणी

सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी, पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागांसह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी. 

रायगड जिल्ह्यात अनेक भागात पावसाची हजेरी

रायगड जिल्ह्यात अनेक भागात पावसाची हजेरी. खोपोली, अलिबाग, महाड, उरण परिसरात मुसळधार, पनवेल परिसरातही जोरदार पावसाची हजेरी.

Mumbai Rains : ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत पावसाची कोसळधार

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडतोय, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. 


मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

आज मान्सूनची मुंबईमध्ये एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूननं मुंबईत प्रवेश केला की, नाही, हे जरी जाहीर झालेलं नसलं तरी रात्रीपासूनच पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अद्यापही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागांत बरसतोय. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. 

पार्श्वभूमी

मुंबई : काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर मुंबईसह उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. लालबाग, परळ, भायखळा, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले या ठिकाणी पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात मान्सूनने दमदार एन्ट्री केली. परंतु पहिल्याच पावसात मुंबईसह उपनगरात दाणादाण उडाली. अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान मुंबईसह, कोकण, पुणे आणि विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


Mumbai Local Train | मान्सूनच्या पहिल्याच सरींनी लोकल सेवा ठप्प


दरम्यान बुधवारी (9 जून) पडलेल्या पहिल्याच मान्सून सरींमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली मीरा-भाईंदर अशा शहरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत होता. साहजिकच याचा परिणाम हा सर्वप्रथम मुंबईच्या लाईफलाईनवर म्हणजेच मुंबई लोकलवर बघायला मिळाला. सतत पडलेल्या पावसामुळे ट्रॅकवरील पाणी धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर स्थगित ठेवण्यात आली होती. सोबत हार्बर मार्गावरील वाहतूक देखील स्थगित होती. मात्र, मुसळधार पाऊस पडूनही पश्चिम रेल्वेवरील वाहतूक स्थगित झाली नाही. 




बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक 214.44 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात 190.78 मिमी आणि शहर भागात 137.82 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरात विक्रोळी येथे सर्वात जास्त 285.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.



Maharashtra Rain Update | मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची तुफान बॅटिंग, जनजीवन विस्कळीत


चेंबूर 280.52 मिमी, मानखुर्द, गोवंडी - 248.52 मिमी, घाटकोपर - 21022 मिमी तर कुर्ला परिसरात 231.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अंधेरी (पूर्व) 271.76 मिमी, मालवणी 253.88 मिमी, गोरेगाव 217.36 मिमी, अंधेरी ( प.) 215.03 मिमी, दहिसर 208.22 मिमी, सांताक्रूझ 207.64 मिमी, वर्सोवा 207.44 मिमी, वांद्रे 86.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.